नांदेड, परभणीत पिके पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 सप्टेंबर 2019

मराठवाड्यात जोरदार पावसाने दणका दिला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने नांदेड, परभणी, हिंगोलीत ओढे, नाले, नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे शेकडो एकर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली. पावसामुळे विदर्भासह मराठवाड्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. कोल्हापुरातही नऊ बंधारे पाण्याखाली गेली आहेत.

धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ; कोल्हापूर, कोकणातही पावसाचा जोर
पुणे - मराठवाड्यात जोरदार पावसाने दणका दिला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने नांदेड, परभणी, हिंगोलीत ओढे, नाले, नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे शेकडो एकर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली. पावसामुळे विदर्भासह मराठवाड्यातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. कोल्हापुरातही नऊ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. कोकणातील श्रीवर्धन, तळा, लांजा आणि मराठवाड्यातील सेनगाव येथे गेल्या २४ तासांमध्ये १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाला सुरवात झाल्याने राधानगरी विद्युत विमोचकातून, तसेच कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. वारणा धरणातूनही पाणी सोडण्यात येत असल्याने वारणा नदीच्या पाण्यात काहीशी वाढ होण्याची शक्‍यता आहे. तुळशी मोठा प्रकल्प, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव, कासारी व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सहा बंधारा पाण्याखाली आहे. भोगावती नदीवरील खडक कोगे बंधारा, तर वारणा नदीवरील चिंचोली व माणगाव बंधारे पाण्याखाली आहे. 

दोन युवक वाहून गेले
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील चार, परभणीतील सात, हिंगोलीतील दोन मंडळांत ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. लोहा तालुक्यात दुचाकीवरून जाणारे दोन युवक ओढ्याच्या पुरात वाहून गेले. पालम तालुक्यातील जोरदार पावसामुळे गळाटी, लेंडी या नद्यांच्या पुरामुळे शेकडो एकरवरील पिके पाण्याखाली गेली. पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे ११ गावांचा संपर्क तुटला आहे. नांदेडच्या लोहा तालुक्यातील लोहा, माळाकोळी, कलंबर, सोनखेड परिसरात ओढे-नाल्यांना पूर आले. धानोरा - मक्ता (ता. लोहा) येथे दोन शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेले.  

बुलडाण्यातील ज्ञानगंगा नदीवर असलेला प्रकल्प भरल्याने नदीकाठावरील गावांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी हगवावीत. तसेच सतर्क राहून पूर आल्यास प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Galati River Flood Nanded Parbhani Agriculture Loss