बनावट सोने विकणारी टोळी गजाआड ; तिघे ताब्यात

बनावट सोने विकणारी टोळी गजाआड ; तिघे ताब्यात

नाशिक : घर खोदकामात सापडलेले सोने स्वस्तात विक्रीच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघा जणांना आडगाव पोलिसांनी सापळा रचत अटक केली. त्यांच्याकडून बनावट सोनेही जप्त केले. या कारवाईत चौथा संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला. यात अहमदाबादमधील एकाचा समावेश आहे. 

संशयित लाला किसन सोळंकी (वय 42, रा. अहमदाबाद), दिलीप चव्हाण (वय 24, रा. दहावा मैल) आणि सुभाष मोहिते (वय 24, रा. आडगाव शिवार) यांनी तपोवन येथे राहणाऱ्या एका तरुणास घर खोदकामामध्ये सोने सापडल्याचे सांगितले. ते विकत घेण्यासाठी विनंती करत सोन्याचा एक मणीही दाखविला. तरुणाने संपूर्ण सोने दाखविण्यास सांगितले. यावर या तिघांनी त्यास नकार दिला. सोन्याचा बाजारभाव 31 हजार रुपये असून, तुला 20 हजार रुपये तोळ्याप्रमाणे सोने देतो असे सांगितले. मात्र, या तरुणाने पैसे जास्त असल्याचे सांगत स्पष्ट नकार दिला. तिघांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा या तरुणास संपर्क साधत 15 हजार रुपये तोळ्याप्रमाणे विकण्याचे कबूल केले. त्यानंतर तरुणाने आडून पाहिल्यानंतर दहा हजार रुपये तोळ्याप्रमाणे विकण्याची तयारी दर्शविली. मात्र संपूर्ण सोने दाखवत नसल्याने या तरुणाला संशय आल्याने त्यांनी ओळखीच्या पोलिसांशी संपर्क साधला. 

सापळा रचत केले गजाआड 

आडगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूजन बिजली यांना तरुणाने माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी आडगाव शिवारातील नवव्या मैलावरील डीआरडीओ कंपनीच्या गेटसमोर सापळा रचला.

तरुणाने संशयितांना सोने खरेदीसाठी या ठिकाणी बोलावले असता संशयित सोने विक्रीसाठी टीव्हीएस कंपनीच्या दुचाकीवरून आले. पोलिसांनी या तिघांना शिताफीने अटक केली. या वेळी दुसऱ्या दुचाकीवरून आलेला चौथा संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाला. त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या तिघा संशयितांकडून सुमारे एक ते दोन किलो वजनाचे बनावट सोने व दुचाकी जप्त केली आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com