गॅंगस्टर फारुख देवडीवालाची पाकिस्तानात हत्या? 

गॅंगस्टर फारुख देवडीवालाची पाकिस्तानात हत्या? 

मुंबई  - भारतात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना इंटर सर्विस इंटेलिजन्सने(आयएसआय) हाताशी घेतलेला गॅंगस्टर फारुख देवडीवालाची पाकिस्तानात हत्या झाल्याच्या माहितीमुळे अंडरवर्ल्डमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा विश्‍वासू असलेला देवडीवाला भारतीय तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण देण्याचे काम करत होता. 

भारताविरोधात घातपाती कारवायांसाठी दुबईतून तरुणांची भरती करत असलेल्या देवडीवालाला या वर्षी मे महिन्यात दुबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. भारतीय यंत्रणा, गुजरात पोलिस त्याचा ताबा घेण्यासाठी पोहोचण्याआधीच पाकिस्तानी यंत्रणांनी तो आपला नागरिक असल्याचे पुरावे सादर करून त्याचा ताबा घेतला होता. भारतात घातपाती कारवाई करण्यासाठी मुंबईतील फैजल मिर्झा व गुजरातमधील अल्लारख्खा खान यांना देवडीवालाने शारजामध्ये बोलावले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी गुप्तचर संघटनांच्या मदतीने पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले. पण परतल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांना त्यांची माहिती मिळाली. त्यानंतर मिर्झा व खानला महाराष्ट्र एटीएसने अटक केली होती. 

देवडीवाला भारताच्या हाती लागणे, पाकिस्तानसाठी हिताचे नसल्यामुळे पाकिस्तानी यंत्रणांनी फार प्रयत्न केले. बोगस पुरावे व पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयनेही जोर लावून देवडीवाल्याचा ताबा मिळवला. त्यानंतर पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे त्याला रवाना करण्यात आले होते. या घडामोडींनंतर गेल्या आठवड्यात त्याची हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. या माहितीमुळे मुंबई अंडरवर्ल्डमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

सुरक्षा यंत्रणांच्या रडारवरून सुटण्यासाठी गॅंगस्टरबाबत अधूनमधून अफवा पसरवल्या जातात. नुकतीच गॅंगस्टर छोटा शकीलच्या हत्येची बातमी पेरण्यात आली होती, पण त्यानंतर शिवाजी पार्क येथील एका व्यावसायिकाला खुद्द खोटा शकीलने दूरध्वनी केल्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे भारतीय यंत्रणाही सर्व पातळीवरून हत्येच्या बातमीबाबत माहिती घेत आहे. 

आयएसआयने काटा काढला? 
देवडीवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आयएसआयविरोधात महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्‍यता होती. भारताविरोधात आयएसआयच्या कारवायांची पोलखोल होण्यापूर्वीच देवडीवालाचा काटा काढण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. 

दुबईत पकडला गेल्यानंतर देवडीवालाला पाकिस्तानने आपला नागरिक दाखवून तेथून हस्तांतरित केले. यापूर्वी छोटा राजनवर गोळीबार करणाऱ्या मुन्ना झिंगाडा पाकिस्तानी नागरिक असल्याचा दावा पाकिस्तानी यंत्रणांना थायलंड न्यायालयात केला होता. पण भारतीय यंत्रणांना सबळ पुरावे सादर करून पाकिस्तानी यंत्रणांचा प्रयत्न हाणून पाडला. तोच प्रयत्न पाकिस्तानने पुन्हा केला. मात्र, देवडीवालाबाबतीत ते यशस्वी ठरले होते. देवडीवालाच्या मृत्यूबाबत भारतीय यंत्रणाही अधिक माहिती घेण्याचे काम करत आहेत. हत्येबाबतची माहिती सूत्रांमार्फत कानावर आली असून त्याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची गुरुवारी रात्री नेपाळच्या सुनसारी जिल्ह्यातील हरिनगर परिसरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. खुर्शीद आलम याच्यावर दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी बेछूट गोळीबार केला. या दुचाकीची नंबरप्लेट भारतीय असल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी देवडीवालाच्या हत्येच्या वृत्तामुळे दहशतवाद्यांविरोधात गुप्त मोहीम तर राबवली जात नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

कोण होता फारुख देवडीवाला? 
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा विश्‍वासू असलेल्या फारुख देवडीवाला (48) यानेच मुंबईतून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी फैजल मिर्झाला ( 32) भारतात घातपाती कारवायांसाठी तयार केले होते. याशिवाय स्फोटकांप्रकरणीही अहमदाबाद पोलिसांनी त्याच्याविरोधात पोटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रकरणी 2010 मध्ये देवडीवाला विरोधात इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी केली होती. गुजरातमधील हिरेन पंड्या यांच्या हत्येवेळीही फारुखचे नाव पुढे आले होते. 

आरोपीच्या चौकशीत मुंबईसह गुजरात व उत्तर प्रदेशात दहशतवादी घातपाती कारवाया करण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजले आहे. फारुख हा देशातील वॉन्टेड आरोपींपैकी एक असून त्याच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. फारुख हा मुंबई व इतर शहरांमधील तरुणांची दहशतवादी कारवायांसाठी भरती करत होता. दाऊद टोळीचे गुजरातमधील काम एकेकाळी फारुख सांभाळायचा. 2002 मध्ये गोध्रा दंगलीवेळी त्याने गुजरातमध्ये दोन किलो आरडीएक्‍स आणले होते. त्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 

मिर्झाचे मुंबईहून शारजाला जाण्यासाठीचे विमान तिकीट फारुखनेच पाठवले होते. तेथे काही दिवस काढल्यानंतर पाकिस्तानातून केनियातील नैरोबी येथे जाणाऱ्या विमानात फैजलला फारुखने बसवून दिले. त्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या एका एजंटच्या मदतीने त्याला पाकिस्तानातच उतरवण्यात आले. तेथे त्याने दोन आठवड्यांचे दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने मुंबईसह देशभरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, वर्दळीची ठिकाणे व अत्यावश्‍यक सेवा पुरवणारी आस्थापना यांच्यावर दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली होती, पण त्यापूर्वीच दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याप्रकरणी फैजल मिर्झा, फारुख देवडीवालासह सहा जणांविरोधात यूएपीएच्या कलम 16, 18, 18(अ), 18(ब), 20 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी नुकतीच दहशतवाद विरोधी पथकाने(एटीएस) मिर्झावर आरोपपत्र दाखल केले आहे. नव्वदीच्या काळात मुंबई व गुजरातमध्ये देवडीवाला वास्तव्याला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com