मराठवाड्यात गांजा येतो आंध्र प्रदेशातून

औरंगाबाद - पुंडलिकनगर पोलिसांनी पकडलेल्या 48 किलो गांजाची याच कारमधून तस्करी झाली होती.
औरंगाबाद - पुंडलिकनगर पोलिसांनी पकडलेल्या 48 किलो गांजाची याच कारमधून तस्करी झाली होती.

औरंगाबाद - जो कुणी गांजाची शेतात लागवड करीन त्याच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा दंडकच राज्यात आहे. अर्थात, गांजा उत्पादनाला राज्यात बंदी आहे. त्यामुळे आंध्र, तेलंगणासारख्या शेजारी राज्यांतून गांजाची मोठ्याप्रमाणावर तस्करी होते. रेल्वेने, तर कधी खासगी वाहनांतून गांजा मराठवाड्यासह नगर जिल्ह्यापर्यंत पोचविला जात असल्याचे पोलिस सांगतात. त्यांच्या कारवाईतूनही या बाबी समोर आल्या आहेत. 

गांजा हा नशेची चटक असणारा लोकप्रिय मादक पदार्थ आहे. दोनशे रुपये प्रतितोळा असा गांजाचा रेट असून, पुड्या तयार करून त्या विकल्या जातात. विशिष्ट कोड गांजासाठी असून नेहमीच्याच ग्राहकाना गांजा विकला जातो. आंध्रप्रदेशातील कदीमनगर येथे गांजाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. तेथूनच राज्यात गांजाची तस्करी होते. औरंगाबादेतही आलेला गांजा मुकुंदवाडी, छोटा मुरलीधरनगर या भागांत चारचाकी मालवाहू जीपद्वारे वितरित केला जातो. या मालावर मिरची व इतर भाजीपालाही ठेवला जातो.

कुणी संशय घेऊ नये म्हणून ही क्‍लृप्ती लढविली जाते. हा माल नेहमीच्या एजंटांना दिल्यानंतर ते गांजाच्या पुड्या तयार करून त्या विक्री करतात. आंध्रप्रदेशातून आलेला गांजा पुढे नगर, शिर्डी व परिसरात वितरित केला जात असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांनी दिली. त्यांनीच ४८ किलो गांजा पकडून तस्कारांवर कारवाई केली. 

सिगारेटमधून गांजाची नशा 
पूर्वी गांजा चिलीममध्ये भरून त्यावर कापड लावून ओढला जात होता; पण काळाच्या ओघात गांजाची भुकटी आता सिगारेटमध्ये भरून नशा केली जाते. एक रुपयात मिळणाऱ्या सिगारेटमध्ये गांजा भरल्यास तीच सिगारेट शंभर रुपयांना विकली जात असल्याची माहिती कारवाई झालेल्या विक्रेत्यांकडून प्राप्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दोनशे रुपयांना तोळाभर गांजा 
औरंगाबादेत गांजा प्रतितोळा दोनशे रुपयांना विकला जातो. नारेगाव, छोटा मुरलीधरनगर, मुकुंदवाडीतील काही भागांतही गांजाची विक्री केली जाते. मुकुंदवाडी रेल्वेस्थानकापासून मुख्य रेल्वेस्थानकादरम्यान लोहमार्ग परिसरात गांजाची विक्री जोरात होते. गांजाची उपलब्धता पाहून रेट वाढवला जातो.

ताडी, हातभट्टी जोरात
एक काळ होता, शहरात ताडीनिर्मिती होत असे. बहुतेकदा ती आयातही केली जायची. जीवन उद्‌ध्वस्त करणारे पेय असे ताडीला संबोधिले जाते. शहरात सद्यःस्थितीत ताडी कुठेही तयार केली जात नाही, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. राजीव गांधी मार्केट भागात फुग्यात ताडी भरून ती छुप्या पद्धतीने विकली जाते; मात्र ती ताडीच आहे का, याची श्‍वाश्‍वती नाही, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. शहरात हातभट्टीची दारू तयार केली जात नाही. वसाहतीपासून लांबवर ती केली जाते. गांधेलीसारख्या दूरवरच्या भागात व जिथे मोसंबीचे मळे आहेत त्या भागात हातभट्टी तयार केली जाते. ग्रामीण भागातील काही वाड्यांवर मात्र हातभट्टी आजही सर्रास सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com