254 रुपयांनी घटले गॅस सिलिंडरचे दर

254 रुपयांनी घटले गॅस सिलिंडरचे दर

तळवाडे दिगर : गेल्या दहा महिन्यांपासून सतत वाढ असलेल्या एलपीजी गॅसच्या दरात गेल्या दोन-अडीच महिन्यांत 254 रुपयांनी घट झाली असून, नोव्हेंबर महिन्यात सुमारे साडेनऊशे रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर सध्या 704 रुपयांना मिळत आहे.

देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर गॅसचे दर थोड्याफार प्रमाणात कमी होऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. शिवाय गेल्या महिन्यात पेट्रोल-डिझेलच्या दरातही काही प्रमाणात घट झाली. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा पेट्रोल डिझेलचे दर वाढत असल्याने त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना सोसावी लागत आहे.

2018 या वर्षाच्या प्रारंभापासूनच महागाईचा निर्देशांक सातत्याने वाढत होता. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. जानेवारी 2018 मध्ये 14 किलोचे गॅस सिलिंडर 762 रुपयांना मिळत होते. त्यानंतर जुलैमध्ये याच गॅस सिलिंडरची किंमत 776 झाली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये 837, ऑक्टोबर महिन्यात 896 रुपये आणि नोव्हेंबर महिन्यात 958 रुपये गॅस सिलिंडरची किंमत झाली.

तसेच मागील महिन्यात मध्यप्रदेश, राज्यस्थान, छतीसगड, मिझोरम, तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपचा पराभव झाला. त्यानंतर मात्र, एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट होण्यास सुरवात झाली. डिसेंबर २०१८ मध्ये १४.२ किलोचे गँस सिलेंडर १३५ रुपयांनी स्वस्त झाले. या महिन्यात हे ८२३ रुपयाला मिळाले. आता जानेवारी महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत १३२ कपात होऊन आता हे सिलिंडर ७०४ रुपयांना मिळत आहे.

नोव्हेंबर ते जानेवारी या अडीच महिन्यात तब्बल २५४ रुपयांनी सिलेंडरच्या किंमतीमध्ये कपात झाली आहे. त्यामुळे निवडणुकीमुळे का होईना; सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने गॅस सिलिंडरच्या किमती कमीच राहण्याची शक्यता आहे.

पेट्रोल, डिझेल या इंधनांच्या किंमतीमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठी आर्थिक झळ सहन करावी लागली होती. डिसेंबर महिन्यात या पाचही राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये देशातील सत्ताधारी भाजपचा पराभव झाला. परिणामी इंधन दरकपातीला सुरवात झाली. मात्र, त्यानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ पुन्हा सुरु झाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com