गौरी लंकेशच्या हत्येचे 'नांदेड कनेक्शन'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

कर्नाटकातील गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे नांदेड कनेक्शन मिळत असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी नांदेड पासींगची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास करणारे एटीएसचे काही अधिकारी नांदेडात तळ ठोकून असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

नांदेड : कर्नाटकातील गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे नांदेड कनेक्शन मिळत असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी नांदेड पासींगची असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास करणारे एटीएसचे काही अधिकारी नांदेडात तळ ठोकून असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

गौरी लंकेश व नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाचा छडा एटीएस आणि सीबीआयने लावला आहे. या प्रकरणातील मारेकरी पथकांनी औरंगाबाद येथून अटक केली. अटक आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या वाहनामध्ये एका दुचाकीचा समावेश होता. तपास यंत्रणेने या दुचाकीचा शोध घेतला असता ती नांदेड पासींगची असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही दुचाकी नेमकी कोणाची आहे यासाठी तपास यंत्रणेचे काही अधिकारी नांदेडात तळ ठोकून असल्याचे सांगण्यात आले. याबद्दल मात्र पोलिस व एटीएसने आमच्याकडे कुठलीच माहिती नसल्याचे सांगितले. सदरची दुचाकी ही जवळपास दहा ते बारा जणांना विकली असल्याचेही तपासात पुढे येत आहे. अत्यंत गोपनीय पध्दतीने तपास सुरू असून गौरी लंकेशच्या हत्येचे नांदेड कनेक्शन मिळत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. कारण, नांदेडच्या पाटबंधारे नगर भागात बॉम्बस्फोट सहा एप्रील 2006 रोजी झाला होता. त्यात दोघांचा मृत्यू तर चारजण जखमी झाले होते. या प्रकरणाचाही तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Gauri lankesh Murder case nanded connection