गावितांच्या भ्रष्टाचाराचा अहवाल सरकारने दडवला - सचिन सावंत

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 7 मे 2017

मुंबई - आदिवासी विकास विभागात केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांच्यावर एम. जी. गायकवाड समितीने ठपका ठेवल्यानंतर कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा धारण करत त्यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा नोंदविण्याची आणि भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी आज केली. त्याचप्रमाणे सरकारने समितीचा अहवाल चार महिने दडवून ठेवल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला.

गावित प्रकरणावर पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, की वाल्याचा वाल्मीकी करताना भाजपचा पारदर्शकतेचा मुखवटा गळून पडला असून, भ्रष्टाचाराला समर्थन देणारा भाजपचा बीभत्स चेहरा समोर आला आहे.
कॉंग्रेस सरकारच्या काळातच न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर तत्कालीन आघाडी सरकारने गावित यांना मंत्रिपदावरून दूरही केले होते. त्या वेळी भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांचा राजीनामाही मागितला होता. मात्र भ्रष्टाचाराविरोधात तथाकथित ओरड करणाऱ्या भाजपने गावित यांच्यासाठी लाल गालीचा अंथरून भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांचा वाल्मीकी करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावितांवर भाजपच्या कोणत्याही नेत्याने आरोप केले नाहीत असे म्हटले होते, अशी माहिती सावंत यांनी दिली.

न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड समितीचा अहवाल चार महिन्यांपूर्वीच राज्य सरकारला प्राप्त झाला होता. परंतु सरकारने तो दाबून ठेवला हे स्पष्ट आहे. चार महिने सरकारने गावितांवर गुन्हा का नोंदवला नाही, याचे उत्तर पारदर्शक मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. त्याचबरोबर गावितांच्या विरोधात तत्काळ गुन्हा नोंदवावा आणि भाजपतून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली. हे प्रकरण धसास लावल्याशिवाय कॉंग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही सावंत यांनी सरकारला दिला.

Web Title: gavit corruption report conceal by government