बारावीत यंदाही मुलीच अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. राज्याचा एकूण निकाल 88.41 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 94.85 टक्के निकाल लागला असून, सर्वांत कमी निकाल नाशिक विभागाचा 86.13 टक्के लागला. 

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. राज्याचा एकूण निकाल 88.41 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 94.85 टक्के निकाल लागला असून, सर्वांत कमी निकाल नाशिक विभागाचा 86.13 टक्के लागला. 

राज्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी आज पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. या वेळी राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले उपस्थित होते. यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे. सर्व विभागांतून 92.36 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, 85.23 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात एक टक्का घट झाली आहे. राज्यात यंदा 14 लाख 16 हजार 986 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी 12 लाख 52 हजार 817 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 6 लाख 68 हजार 125 मुले, तर 5 लाख 84 हजार 692 मुली उत्तीर्ण झाल्या. 

राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक 94.85 टक्के निकाल लागला. नाशिक विभागाचा सर्वांत कमी म्हणजे 86.13 टक्के निकाल लागला आहे. राज्यातील नऊ विभागीय मंडळांतून सर्व शाखांमधून एकूण 66 हजार 456 पुनर्परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी 22 हजार 792 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यांचा निकाल 34.30 टक्के आहे. एकूण 210 विषयांची परीक्षा घेण्यात आली, त्यामध्ये 56 विषयांचा 100 टक्के निकाल लागला आहे. राज्यभरात 3 हजार 199 विद्यार्थ्यांना क्रीडाचे गुण देण्यात आले आहेत. 

विभागनिहाय निकाल  (आकडे टक्‍क्‍यांमध्ये) 
कोकण - 94.85 
कोल्हापूर - 91 
पुणे - 89.58 
औरंगाबाद - 88.74 
लातूर - 88.31 
अमरावती - 88.08 
मुंबई - 87.44 
नागपूर - 87.57 
नाशिक - 86.13 

शाखानिहाय निकाल 
विज्ञान शाखा - 95.85 टक्के 
कला शाखा - 78.93 टक्के 
वाणिज्य शाखा - 89.50 टक्के 
व्यवसाय अभ्यासक्रम - 88.18 टक्के 

विद्यार्थ्यांसाठी सूचना 
महाविद्यालयांमध्ये 12 जूनला दुपारी तीन वाजल्यापासून गुणपत्रिका मिळणार 
उद्यापासून (ता.31) गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार 
गुणपडताळणीसाठी 31 मे ते 9 जूनपर्यंत, छायाप्रतीसाठी 31 मे ते 11 जूनपर्यंत अर्ज 
- पुनर्मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य 
- छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा 
- विद्यार्थ्यांना श्रेणी आणि गुणसुधार योजनेंतर्गत परीक्षेस पुन्हा प्रविष्ट होण्यासाठी जुलै-ऑगस्ट 2018 आणि फेब्रुवारी-मार्च 2019 या दोनच संधी 
- बारावीची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये देता येणार 

राज्यातील शाखानिहाय शून्य टक्के निकाल 
विज्ञान - 10 महाविद्यालये 
कला - 26 महाविद्यालये 
वाणिज्य - 11 महाविद्यालये 
व्यावसायिक - 1 महाविद्यालय 
एकूण - 48 महाविद्यालये 

राज्यातील शाखानिहाय शंभर टक्के निकाल लागलेली महाविद्यालये - 
विज्ञान - 1,356 महाविद्यालये 
कला - 290 महाविद्यालये 
वाणिज्य - 594 महाविद्यालये 
व्यावसायिक - 61 महाविद्यालये 

गतवर्षीच्या तुलनेत शाखानिहाय निकालाची टक्केवारी 
शाखा फेब्रु-मार्च 2017 फेब्रु-मार्च 2018 तुलनात्मक स्थिती 

विज्ञान 95.85 टक्के 95.85 टक्के ----- 

कला 81.91 टक्के 78.93 टक्के -2.98 टक्के 

वाणिज्य 90.57 टक्के 89.50 टक्के - 1.07 टक्के 

व्यवसाय अभ्यासक्रम 86.27 टक्के 82.18 टक्के -4.09 टक्के 
----- 

एकूण 89.50 टक्के 88.41 टक्के -1.09 टक्के 

दिव्यांग विद्यार्थ्यांचा 91.78 टक्के निकाल 
राज्यभरात 5 हजार 932 दिव्यांग परीक्षेला बसले. त्यापैकी 4 हजार 932 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांचा 91.78 टक्के निकाल लागला. मुंबई विभागातील पनवेल येथील महात्मा फुले ज्युनिअर कॉलेजमधील अनुराग रोहिदास ठोंबरे या एकमेव विद्यार्थ्याला संगणकावर बारावीची परीक्षा देण्याची परवानगी राज्य मंडळाकडून देण्यात आली होती. 

कॉपीची 1,039 प्रकरणे 
राज्यभरात 258 भरारी पथके नेमण्यात आली होती. त्यामध्ये एकूण 1 हजार 39 कॉपी प्रकरणे तर 12 जणांना तोतयेगिरी करताना पकडण्यात आले. संबंधितांविरोधात राज्य मंडळाकडून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड येथे उत्तरपत्रिका जळितप्रकरणी 14 जणांना निलंबित करून चौकशी सुरू आहे. यामध्ये बाधित विद्यार्थ्यांना विशेष बाब म्हणून उत्तीर्ण करण्यात आले आहे. तसेच, विद्यार्थ्यांसाठी 12 समुपदेशकांची नेमणूक करण्यात आली होती. 

Web Title: Girl top Maharashtra State Board HSC Result