SSC Results : दहावीचा निकाल 77.10 टक्के; यंदाही मुलीच 'नंबर वन'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

निकाल पाहा या संकेतस्थळांवर : 
- www.mahresult.nic.in 
- www.sscresult.mkcl.org 
- www.maharashtraeducation.com 

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2019मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (शनिवारी) जाहीर झाला. महाराष्ट्रात 77.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल पाहता येणार आहे. 

राज्यात 82.82 टक्के विद्यार्थीनी तर 72.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे यंदाही दहावीत मुलींनीच बाजी मारल्याचे दिसते. तर विभागवारी टक्केवारीत कोकण विभागाचा सर्वाधिक 88.38 टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 67.27 टक्के निकाल लागला.

विभागनिहाय टक्केवारी

पुणे - 82.48%

कोकण - 88.38%

नागपूर - 67.275

औरंगाबाद - 75.20%

मुंबई - 77. 04%

कोल्हापूर - 86.58%

आमरावती - 71.98%

नाशिक - 77.58%

लातूर - 72. 87%

दहावीचा अभ्यासक्रम 2018-19 या शैक्षणिक वर्षात बदलण्यात आला. या नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीचा हा पहिला निकाल आहे. राज्यातील जवळपास 17 लाख 813 विद्यार्थ्यांनी यंदा दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील 16 लाख 41 हजार 568 विद्यार्थ्यांनी नव्या अभ्यासक्रमानुसार, तर 59 हजार 245 विद्यार्थ्यांनी जुन्या अभ्यासक्रमानुसार नोंदणी केली. राज्यातील 22 हजार 244 माध्यमिक शाळांमधील हे विद्यार्थी आहेत. राज्यातील चार हजार 874 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा झाली होती. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. या निकालाची प्रिंटआउटही विद्यार्थ्यांना घेता येणार असल्याचे मंडळाने सांगितले आहे. 

सोमवारपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. या अर्जाचा नमुना www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी 19 जूनपर्यंत; तर छायांकित प्रतीसाठी 19 जूनपर्यंत अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करताना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेणे बंधनकारक आहे. ही प्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांत विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी विभागीय मंडळाकड अर्ज करावा, असे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

निकाल पाहा या संकेतस्थळांवर : 
- www.mahresult.nic.in 
- www.sscresult.mkcl.org 
- www.maharashtraeducation.com 

- ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. 
- गुणपडताळणीसाठी : 10 ते 19 जूनपर्यंत अर्ज करता येईल. 
- छायाप्रतीसाठी : 10 ते 29 जूनपर्यंत अर्ज करता येईल. 
- उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यापुढील पाच दिवसांत अर्ज करावा. 
- दहावीत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत जुलै-ऑगस्ट 2019 आणि मार्च 2020 अशा दोन संधी उपलब्ध राहतील. 

निकाल असा पाहा 
- निकाल पाहण्यासाठी तुमचा आसन क्रमांक स्पेस न देता टाईप करा 
- नंतरच्या रकान्यात आईच्या नावाची पहिली अक्षरे लिहा 
- समजा, तुमचा आसन क्रमांक M123456 आणि तुमच्या आईचे नाव वर्षा असल्यास पहिल्या रकान्यात M123456 आणि दुसऱ्या रकान्यात VAR असे लिहा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girls create impact in SSC results with high passing percentage in Maharashtra