बरेवाईट बोला; पण कर्जमाफी द्या! - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

मुख्यमंत्र्यांनी हवे तर आम्हाला बरेवाईट बोलावे; पण कृपया राज्यातील शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी. 
- अशोक चव्हाण, खासदार व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष 

मुंबई - ""राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी "संघर्ष यात्रे'बद्दल बोलताना विरोधकांना कोडगे आणि निर्लज्ज असे अपशब्द वापरले. आम्हाला याहीपेक्षा अधिक बरेवाईट बोला; पण संकटात असलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी द्या,'' असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी आज मुख्यमंत्र्यांना केले. 

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत भूमिका मांडताना चव्हाण म्हणाले, ""विरोधकांचा सन्मान राखण्याची प्रगल्भ लोकशाही परंपरा महाराष्ट्रात आहे. याअगोदर गेल्या 57 वर्षांच्या राज्याच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्याने विरोधकांकरिता अशा भाषेचा वापर केलेला नाही. असे असतानाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असे शब्द वापरून आनंद मिळत असेल, तर त्यांच्याकडून यापेक्षाही वाईट शब्द ऐकण्याची आमची तयारी आहे; परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे.'' 

चव्हाण पुढे म्हणाले, की राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. गेल्या अडीच वर्षांत साडेनऊ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. एकाही शेतमालाला हमीभाव मिळत नाही. राज्यात तूर उत्पादक शेतकरी गेल्या कित्येक दिवसांपासून घर-दार सोडून खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभा आहे. त्याने तूर भरून आणलेल्या ट्रॅक्‍टर आणि टेम्पोचे भाडे तूर विकल्यावर त्याला मिळणाऱ्या रकमेइतके होऊ लागले आहे. उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कैकपटींनी जास्त आहे. तसेच, महाराष्ट्राची आर्थिक क्षमताही उत्तर प्रदेशपेक्षा मोठी आहे. भाजपने उत्तर प्रदेशात कर्जमाफी दिली, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही राज्य सरकारने कर्जमाफी द्यावी. 

मुख्यमंत्र्यांनी राज्यातील तूर उत्पादकांना शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरू राहतील, असा शब्द दिला होता. परंतु, फक्त 22 एप्रिलपर्यंतच नोंद झालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आदेश दिल्याने आपल्याच मंत्र्यांच्या "घाई करू नका', "रांगेत उभे राहण्याची गरज नाही,' या शब्दांवर आणि तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यांना फसगत झाल्याचे वाटत आहे, असे चव्हाण म्हणाले. 

Web Title: give debt relief farmer