शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्या! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

राज्यातील पूरस्थिती हाताळण्यात राज्य सरकार आणि प्रशासन कमी पडल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर बोट ठेवले. पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने येथील शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करीत पूरस्थितीचे गांभीर्य जाणून केंद्र सरकारने राज्य सरकारला सहकार्य करावे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. 

पुणे - राज्यातील पूरस्थिती हाताळण्यात राज्य सरकार आणि प्रशासन कमी पडल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर बोट ठेवले. पुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने येथील शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करीत पूरस्थितीचे गांभीर्य जाणून केंद्र सरकारने राज्य सरकारला सहकार्य करावे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. 

राज्यातील काही जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण होऊन घरे, शेती आणि उद्योगांचे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे, दिलीप बराटे, अंकुश काकडे उपस्थित होते. 

कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील नुकसानीची माहिती देत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वांनी एकत्र यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

पवार म्हणाले, ""पुरामुळे घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. या भागांत अशी स्थिती कधीच ओढवली नव्हती. पुराचे पाणी ओसरताच राज्य सरकारने पंचनामे करून लोकांना तातडीची मदत करावी. राजकीय मतभेद, टीका-टिप्पणी बाजूला ठेवून मदतीसाठी धावले पाहिजे. कर्नाटक सरकारनेही वाद करण्यापेक्षा मदतीचा विचार करावा. अलमट्टी धरणातून किती पाणी सोडायचे, याचे नियोजन तज्ज्ञांकडून केले जाते. पाणी सोडल्यानंतर पुढे साठविण्याची क्षमता किती आहे? याचाही विचार केला पाहिजे. मात्र, यासंदर्भातील महाराष्ट्राची भूमिका योग्य आहे.'' 

""पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पक्षाचे आमदार-खासदार आणि अन्य पक्षांच्या मानधनातून 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, राष्ट्रवादीच्या डॉक्‍टर सेलच्या वतीनेही लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येतील,'' असेही त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीची यात्रा दुष्काळी भागापुरतीच 
पूरस्थिती असताना राजकीय पक्षांकडून काढल्या जात असलेल्या विविध यात्रा थांबविल्या पाहिजे का? या प्रश्‍नावर, ""राष्ट्रवादीची यात्रा ही दुष्काळी भागापुरतीच आहे. या भागातील लोकांशी चर्चा करून मदत करण्याचा उद्देश आहे. ती काही जिल्ह्यांपुुरतीच आहे. त्यानंतर ती थांबविण्यात येईल,'' असे पवार यांनी स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give hundred percentage loan waiver to farmers says sharad pawar