रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी कोठे उपलब्ध होणार वाचा

ठाणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी ग्लोबल इम्पॅक्‍ट हब उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.
ठाणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी ग्लोबल इम्पॅक्‍ट हब उपक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले.

ठाणे - ठाणे शहरात नव्याने चालू करण्यात येणाऱ्या उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणे व त्याद्वारे ठाणे शहराच्या आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या ग्लोबल इम्पॅक्‍ट हब उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी उद्‌घाटन करण्यात आले. ग्लोबल इम्पॅक्‍ट हबचे आणि हबच्या संकेतस्थळाचेही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

ग्लोबल इम्पॅक्‍ट हब उपक्रमाच्या माध्यमातून शहर व आसपासच्या परिसरातील नागरिकांचे राहणीमान उंचावणे, रोजगार आणि उद्योगाच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे व त्याद्वारे शहराचा एकूण आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी ग्लोबल स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत ठाणे महापालिकेमार्फत शहरात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गुरुवारी (ता. ६) काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिमोट कंट्रोलद्वारे हे उद्‌घाटन केले. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारमार्फत देशात नव्याने चालू होणाऱ्या स्टार्टअप उद्योग-व्यवसायांना चालना देण्यासाठी विशेष धोरण अवलंबण्यात आले आहे. त्यासाठी राज्य शासनानेदेखील त्यानुसार हे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार आता ठाणे महापालिकादेखील हे धोरण अवलंबणार असून त्याचाच एक भाग म्हणून ग्लोबल इम्पॅक्‍ट हबसारखी योजना राबवली जात आहे. या हबची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे हे राज्यातील पहिले आणि व देशातील दुसरे सर्वांत मोठे स्टार्टअप हब ठरणार आहे. प्रस्तावित ग्लोबल इम्पॅक्‍ट हबद्वारे समाजातील विविध स्तरांतील महिलांसाठी प्राधान्याने रोजगार निर्मिती व व्यवसाय चालू करण्यासाठी विशेष सुविधा आदींचा यात समावेश असणार आहे. या हबद्वारे पुढील पाच वर्षांत व त्यानंतर पुढील काळात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करणे, शहरात कॉर्पोरेट क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमार्फत संशोधन व विकास सुविधा विकसित करणे, शहरातील अस्तित्वातील उद्योगधंदे, हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट, लघुउद्योग आदींना चालणा देणे व त्यांच्या व्यवसायात वाढ करणे, नव्या स्टार्टअपमुळे महापालिकेच्या महसुली उत्पन्नात अप्रत्यक्षपणे वाढ होणेदेखील अपेक्षित धरण्यात आले आहे.

पीपीपी तत्त्वानुसार हबची उभारणी
दरम्यान, ग्लोबल हबची उभारणी ही सार्वजनिक व खासगी भागीदारीतून म्हणजेच पीपीपी तत्त्वावर केली जाणार आहे. या हबची स्थापना, देखभाल-दुरुस्ती व त्याच्या परिचालनाची जबाबदारी ठाणे महापालिका व सहभागी खासगी संस्थांवर असणार आहे. यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून स्टार्ट हबसाठी बांधीव स्वरूपात जागा नाममात्र भाड्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे; तर भागीदाराची जबाबदारी कंपनीची नोंदणी करणे, तिचे संचालन करणे, देखभाल-दुरुस्ती, दैनंदिन कामकाज ना नफा तत्त्वावर चालवणे, कर्मचाऱ्यांची भरती करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ज्ञ व प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवणे आदी संबंधित कामे अशी असणार आहे.

ठाणे महापालिकेत रुस्तमजी गृहसंकुलात साकेत-बाळकुम रस्त्यावर टाऊन सेंटर इमारत बांधीव सुविधेच्या स्वरूपात उपलब्ध होणार आहे. ही टाऊन सेंटर इमारत ग्लोबल इम्पॅक्‍ट हबसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा कालावधी हा ३० वर्षे असणार आहे. महापालिकेस सध्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे एक लाख २० हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात 
येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com