'स्थानिक समस्यांवर जागतिक उपाय'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरममध्ये सहभागी सर्व तज्ज्ञांनी राज्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी सक्रिय सहभाग देण्याचे मान्य केले आहे. राज्याच्या विविध भागांत वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या निवडक लोकांना फोरममध्ये सहभागी करून घेतले आहे. शेती, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रांत नावाजलेल्यांचा यामध्ये समावेश आहे. त्याचबरोबर ‘तनिष्का फाऊंडेशन’, ‘यिन’ आणि महान राष्ट्र नेटवर्कचे सदस्य या परिषदेत सहभागी झाले आहेत. सर्वांनी एकत्रित काम करून महाराष्ट्रात सकारात्मक बदल घडविण्याचा उद्देश यामागे आहे.

मुंबई - सामान्य नागरिक स्वत:च्या व व्यवस्थेमधील समस्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना प्रत्येक स्थानिक समस्येवर जगभरातील नामांकित संस्थांच्या सहयोगाने ‘वैश्विक’ उपाय शोधून महाराष्ट्रासोबतच ‘महान राष्ट्र’ निर्मितीची सुरुवात करूया. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ व ‘डििलव्हरिंग चेंज फाऊंडेशन’च्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमात सहभागी होत श्वाश्वत विकासाच्या दिशेने आत्मविश्वासाचे पाऊल टाकूया. भविष्यात कोणत्याही नागरिकाला समस्येसाठी रस्त्यावर उतरावे लागणार नाही, असे काम एकत्र येऊन करूयात, असे आवाहन डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी केले.

डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनची दोन दिवसांची विचारमंथन परिषद आजपासून सुरू झाली. त्यामध्ये पवार यांनी जगभरातील नावीन्यपूर्ण व परिणामकारक संशोधनाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक क्षेत्राचा विकास करणे सहज शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला. स्थानिक समस्या अधिक जटिल असताना त्यावर शास्त्रशुद्ध व तंत्रज्ञानाच्या आधारे उपाययोजना होत नसल्याची खंत व्यक्त केली. समाजातील महिला, युवक, बेरोजगार, शेतकरी यांच्या नेमक्या समस्यांचे वर्गीकरण करून त्यावर जगातील प्रथितयश संस्थांच्या माध्यमातून मात करणे शक्य आहे़. मात्र, त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

यासाठी डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशने यशस्वी अजेंडा तयार केल्याचे सादरीकरण अभिजित पवार यांनी परिषदेत केले. सध्या सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून ७० लाख महिलांपर्यंत ‘तनिष्का’ हे नेटवर्क महाराष्ट्रात पोहचले आहे, तर चार हजार महाविद्यालयांतून १६ लाख विद्यार्थ्यांचे ‘यिन’ हे संघटन बांधले आहे. त्यासोबतच १० लाखांहून अधिक शेतकरी व महान राष्ट्रनिर्मितीच्या माध्यमातून सुमारे दीड ते दोन कोटी नागरिक आज सकाळ माध्यम समूहाच्या विविध उपक्रमांतून जोडलेले आहेत. लोकसहभाग व त्याला सरकार आणि नामांकित जागतिक संस्थांचे तंत्रज्ञान यांची सांगड मिळाली असून, ‘बोर्डरूम ते ग्रासरूट’ असा विकासाचा आराखडा तयार आहे. तो प्रभावी व पारदर्शकपणे राबविण्याचा संकल्प सकाळ माध्यम समूहाने केलेला आहे.  यामध्ये जातीपातीच्या पलीकडे सर्व समाज एकत्र आल्यास ‘महान राष्ट्र’ निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात येईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार
महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध प्रमुख क्षेत्रांवर फाऊंडेशनचे काम सुरू आहे. यामध्ये शेतकरी हा वर्ग प्राधान्याने निवडलेला अाहे. तीन लाख शेतकऱ्यांना इस्राईलमधील नामांकित संस्थांच्या सहयोगाने प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यातून शेती व शेतकरी समृद्ध झाल्याचे चित्र लवकरच दिसेल, असेही पवार म्हणाले. शेतकरी, युवक व महिला यांना कौशल्य प्रशिक्षणाची सकाळ माध्यम समूहाची ही चळवळ महाराष्ट्रातील परंपरागत समस्यांवर कायमची मात करणार अाहे. ज्या सामान्य नागरिकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेणे शक्य नाही, त्या वंचित वर्गाला फाऊंडेशन व सकाळ हे हक्काचे व्यासपीठ आहे. याचा  उपयोग करून विकासप्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन पवार यांनी केले.

Web Title: Global solutions to local problems