दक्षिण भारतात जाण्यासाठी पुण्यातून रेल्वे गाड्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

प्रवाशांची काही प्रमाणात अडचणीतून सुटका होणार

पुणे :  गेल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेची सेवा ठप्प असल्याने अडकून पडलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कारण, मुंबईहून पुणेमार्गे दक्षिण भारतात जाणाऱ्या काही गाड्या आता पुणे रेल्वे स्थानकातून सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे अडकून पडलेल्या प्रवाशांची काही प्रमाणात अडचणीतून सुटका होणार आहे. 

मुंबई, लोणावळा, खंडाळ्यात पडलेला मुसळधार पाऊस आणि रेल्वे मार्गावर पडलेल्या दरडींमुळे गेल्या आठवड्यापासून मध्य रेल्वेची सेवा विस्कळित आहे. त्यात पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे मुंबईहून पुणेमार्गे दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्याही अडकून पडल्या आहेत. या गाड्या पुणे स्थानकातून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम (18520) ही गाडी 12 ते 17 ऑगस्ट या कालावधीत पुणे स्थानकातून सोडली जाणार आहे. तसेच, विशाखापट्टणम येथून आलेली गाडी पुण्यातच थांबणार आहे. हैदराबाद-मुंबई-हैदराबाद (12702 व 12701) ही गाडी 12 ते 16 ऑगस्ट तर पुदुच्चेरी-दादर-पुदुच्चेरी गाडी 11, 13 आणि 14 ऑगस्टला पुण्यातून धावणार आहे. तिरुनावेल्ली-दादर-तिरुनावेल्ली एक्‍स्प्रेस 12, 15 आणि 16 ऑगस्ट आणि दादर-म्हैसूर-दादर एक्‍स्प्रेस 15 ऑगस्टला पुण्यातून धावणार आहेत. परिणामी, पुढील आठवड्यात विकेंडला जोडून आलेल्या सुट्यांमुळे बाहेरगावी जाणाऱ्यांना या गाड्या सोयीच्या ठरणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To go to South India Now trains from Pune