कक्ष अधिकाऱ्यावरच "देव कोपला'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - सरकारी कार्यालयांत देवदेवतांचे छायाचित्र लावण्यास बंदी करणारे पत्र काढणाऱ्या कक्ष अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावल्याने हे प्रकरण अधिकच तापण्याचे संकेत आहेत. ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी आ. व. वरकडे यांनी 4 जानेवारी रोजी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून कोणत्याही देव देवतांची छायाचित्र कार्यालयात लावू नयेत, असा आदेश काढला होता. सरकारने हे पत्र मागे घेतले असले, तरी 2002 चे परिपत्रक कायम राहील, असा खुलासा नवीन पत्रात केल्याने देवदेवतांचे छायाचित्र सरकारी कार्यालयांत लावण्यास बंदी कायमच राहणार आहे.

ग्रामविकास विभागाच्या 4 जानेवारीच्या आदेशावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक होत सरकारवर टीकास्त्र सोडले होते. शिवसेनेच्या मंत्र्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेत हा आदेश मागे घेण्याची विनंती केली होती; मात्र 25 जानेवारीलाच हे पत्र मागे घेतल्याचे स्पष्ट करत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिवसेनेचा आरोप निराधार असल्याची टिका केली.

यासंबंधी कक्ष अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीसदेखील बजावल्याचे सांगितले. या प्रकरणात मात्र कक्ष अधिकाऱ्याचा बळी गेल्याची चर्चा मात्र मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. कक्ष अधिकारी अशाप्रकारे स्वत:हून पत्र काढूच शकत नाहीत. वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय कक्ष अधिकारी असे धाडस करूच शकत नसल्याचा दावा कर्मचारी करत आहेत.

दरम्यान, सरकारने 4 जानेवारीचे पत्र मागे घेतलेले असली तरी यापूर्वी न्यायालयाच्या आदेशाने लागू असलेले सर्व नियम जसेच्या तसे असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे देवदेवांचे छायाचित्र लावण्यास बंदीचा ताजा आदेश मागे घेतलेला असला, तरी यापूर्वीच्या सरकारने काढलेला आदेश कायम असल्याचे पत्रामध्ये स्पष्ट केले आहे.

Web Title: God Photo ban issue