हिरकणी कक्षांची झाली गोदामे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

मुंबई - प्रवास करणाऱ्या मातांना आपल्या तान्हुल्यांना स्तनपान करता यावे या उद्देशाने राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांवर 2013 मध्ये "हिरकणी कक्ष' उघडण्यात आले; पण आज या हिरकणी कक्षांची अवस्था गोदामांसारखी झाली आहे. सरकारी अनास्थेमुळे महिलांसाठी राबवलेल्या एका चांगल्या योजनेला "खो' बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

मुंबई - प्रवास करणाऱ्या मातांना आपल्या तान्हुल्यांना स्तनपान करता यावे या उद्देशाने राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांवर 2013 मध्ये "हिरकणी कक्ष' उघडण्यात आले; पण आज या हिरकणी कक्षांची अवस्था गोदामांसारखी झाली आहे. सरकारी अनास्थेमुळे महिलांसाठी राबवलेल्या एका चांगल्या योजनेला "खो' बसण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

जिल्ह्याच्या ठिकाणी बसस्थानकावर रात्री- अपरात्री महिलांची ये- जा सुरू असते. स्थानकांवर पुरुषांची संख्या जास्त असल्याने स्तनदा मातांची मोठी अडचण होते. गर्भवती आणि वृद्ध महिलांची गैरसोय होते. यासाठी हिरकणी कक्ष सुरू केले. मात्र हे कक्ष आणि त्यांच्या वापराबद्दल पुरेशी जनजागृती केलेली नसल्याने अनेकांना याची कल्पनाच नाही. या कक्षांचा लाभ आतापर्यंत किती महिलांनी घेतला याची आकडेवारी उपलब्ध नाही. काही ठिकाणी कक्षांना कुलूप आहे. काही ठिकाणी कार्यालयांतील जुन्या फाइली आणि सामान ठेवण्यात आले आहे. गोदामांसारखा या कक्षाचा वापर होत आहे. सरकारी सूचनेनुसार हिरकणी कक्ष स्वतंत्र असला पाहिजे; पण कोल्हापूर एसटी स्थानकात जुन्या पोलिस कक्षाचे रूपांतर हिरकणी कक्षात करण्यात आले आहे. उस्मानाबाद येथील आठ स्थानकांमधील हिरकणी कक्षांत धूळ साचली आहे. वाशीम जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हिरकणी कक्ष कुलूपबंद अवस्थेत आहेत. नाशिक, नांदेडमध्ये अतिक्रमणांचा विळखा पडल्यामुळे या कक्षांकडे महिलांनी पाठ फिरवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल येथील हिरकणी कक्षांची स्थिती समाधानकारक असली, तरी यातील काही ठिकाणी बाळांना बाहेरील दूध पाजायचे असेल किंवा घरातून आणलेले बाटलीबंद दूध गरम करून हवे असेल तर पैसे घेतले जातात, असे महामंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

मंत्रालयात वातानुकूलित कक्ष 
मंत्रालयात काम करणाऱ्या स्तनदा महिलांसाठी हिरकणी कक्षाकरिता महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला. गृह विभागातील कर्मचारी माधुरी गवळी तान्हुल्याला घेऊन मंत्रालयात येत असत. तळमजल्यावर आडोशाला त्यांची सासू आणि पती बाळाला सांभाळत असत. हे समजल्यावर मुंडे यांनी मंत्रालयात हिरकणी कक्ष सुरू करण्याचे आदेश दिले. महिला बालकल्याण विभागाने केलेल्या पाठपुराव्यामुळे ऑक्‍टोबर 2015 पासून तळमजल्यावर वातानुकूलित हिरकणी कक्ष सुरू झाला. 

Web Title: The godowns of Hirakani cells