सोने तस्करीच्या आडून दहशतवाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

मुंबई - मुंबईत अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी फैजल मिर्झा (वय 32) याला सोने तस्करीतून झटपट पैसा कमवून देण्याच्या नावाखाली "डी कंपनी'शी संबंधित फारुख देवडीवाला याने शारजात बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याचे माथे भडकवून त्याला कराचीत दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाठवल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. फारुखला शारजातून ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही.

अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा विश्‍वासू छोटा शकीलशी संबंधित असलेला फारुख देवडीवाला हा पाकिस्तानी पासपोर्टच्या आधारावर शारजामध्ये राहत होता. 1996 ते 1999 मध्ये शकीलसाठी सक्रिय असलेल्या फारुखचे नाव सुरत स्फोटात आले होते. त्याप्रकरणी त्याच्याविरोधात "पोटा' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर गायब झालेला फारुख हा "डी कंपनी'साठी सोने तस्करीचे काम करत होता. त्यातून त्याने अनेक मुलांना सोने तस्करीच्या नावाखाली शारजाला बोलावले. त्यापैकी फैजल मिर्झा एक. फारुखचा नातेवाईक असलेल्या फैजललाही सोने तस्करीसाठी शारजात बोलवले होते.

त्यानंतर अधिक पैसे कमवण्याच्या नावाखाली त्याला कराचीत दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाठवले होते. अशाच पद्धतीने फारुखने इतर तरुणांनाही दहशतवादी कारवायांमध्ये गुंतवल्याचा संशय आहे. हे सर्व पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा "आयएसआय'साठी करत होते. 2012 मध्ये फारुखविरोधात सुरत पोलिसांच्या विनंतीवरून इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. याप्रकरणी फैजल मिर्झा, फारुख देवडीवालासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी नुकतीच अटक केलेले संशयित दहशतवादी याच मॉड्यूलचे असल्याचा संशय असून, त्याची पडताळणी सुरू आहे.

Web Title: gold smuggling terrorist crime