आनंदाची बातमी; उजनीत दौंड येथून येतेय 17679 क्‍सुसेक पाणी

संतोष सिरसट 
Thursday, 6 August 2020

धरणाच्या पाण्याची स्थिती कंसात मागील वर्षी 
उपयुक्त पाणीसाठा ः 7.69 टीएमसी (46.53 टीएमसी) 
उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ः 14.36 (86.84) 
दौंड येथून येणारे पाणी ः 17679 क्‍सुसेक (220176 क्‍सुसेक) 

सोलापूर ः उजनी धरणाकडे तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. मागील एक-दोन दिवसापासून पुणे जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे उजनी धरणात दौंड येथून येणाऱ्या पाण्यात वाढ झाली आहे. सोलापूर, पुणे, नगर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. उजनी धरण 100 टक्के केव्हा भरेल याकडे या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. 

मागील वर्षीची तुलना करता धरणात यंदाच्या वर्षी कमी पाणीसाठा आहे. मागील वर्षी सुरवातीच्या काळात पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे आजच्या दिवशी धरणात जवळपास दोन लाख 21 हजार क्‍युसेकने पाणी धरणात येऊन मिसळत होते. त्यामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढली होती. मागील वर्षी आजच्या दिवशी धरण 86 टक्‍यांमध्ये आले होते. पण, आजची स्थिती पाहिली तर धरण 14 टक्‍यांच्या पुढे सरकले आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात कमी पाणीसाठा असल्याचे स्पष्ट होते. 

सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला चांगला पाऊस झाला होता. याऊलट पुणे जिल्ह्यात या काळात पाऊस न झाल्याने पुणे जिल्ह्यातील धरणे अद्यापही भरलेली नाहीत. पण, दिलासादायक बाब म्हणजे मागील दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातही पाऊस पडू लागला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे भरल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणात येणार आहे. त्यानंतर धरण शंभर टक्के भरणार आहे. पण, त्यासाठी पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची अपेक्षा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे. दौंड येथून येणारे पाणी वाढत गेले तर धरणातील पाणीसाठा लवकर वाढण्यास मदत होणार आहे. 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news; 17679 cusecs of water comes from Daund in Ujani dam