‘टेट’ उत्तीर्ण उमेदवारांसाठी गुड न्यूज! एप्रिलमध्ये होणार ३० हजार शिक्षकांची भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School
‘टेट’ उत्तीर्ण उमेदवारांसाठी गुड न्यूज! एप्रिलमध्ये होणार ३० हजार शिक्षकांची भरती

‘टेट’ उत्तीर्ण उमेदवारांसाठी गुड न्यूज! एप्रिलमध्ये होणार ३० हजार शिक्षकांची भरती

सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये सद्य:स्थितीत विद्यार्थी संख्येच्या तुलनेत ३२ हजार शिक्षक कमी आहेत. तर माध्यमिक शाळांमध्येही २९ हजारांपर्यंत पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी त्यातील ३० हजार पदांची भरती शालेय शिक्षण विभागाकडून केली जाणार आहेत. ‘टेट’चा निकाल जाहीर झाल्याने एप्रिलमध्ये भरती प्रक्रियेला सुरवात होणार असून १२ जूनपूर्वी पदे भरली जाणार आहेत.

आता जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भरती ‘पवित्र’ पोर्टलद्वारे होणार आहे. त्यासाठी ‘टेट’ उत्तीर्ण उमेदवारांची मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार ऑनलाइन पद्धतीनेच त्याठिकाणी संबंधित उमेदवारांची शिक्षक म्हणून भरती होणार आहे. खासगी अनुदानित संस्थांना मात्र दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यांच्या संस्थेतील रिक्तपदासाठी एका जागेसाठी एक की दहा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवायचे, याचा निर्णय संबंधित संस्थेनेच घ्यायचा आहे. पण, त्या पदभरतीवर शिक्षणाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वॉच ठेवला जाणार आहे. भरतीपूर्व सर्व शिक्षणाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक होणार असून त्यात त्यांना पदभरतीच्या अनुषंगाने सूचना दिल्या जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन महिन्यानंतर पुन्हा पदभरतीची संधी

राज्य सरकारने १० नोव्हेंबर २०२२ रोजी एक आदेश काढला आहे. त्यानुसार शासकीय पदांची भरती करताना काही कारणास्तव एखाद्या विभागाला पहिल्या टप्प्यात पदभरतीस अडचणी आल्या, तर त्यांना तीन महिन्यांनी पुन्हा पदभरतीची जाहिरात काढून भरती करता येणार आहे. त्यासाठी बिंदुनामावली अद्ययावत असणे बंधनकारक आहे. मागासवर्गीय कक्षाकडून त्याची पडताळणी करावी लागणार आहे. तर शिक्षक भरती ही २०२२-२३च्या आधार बेस्‌ड संचमान्यतेवर होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमधील अंदाजे १५ हजार आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील १५ हजार पदांची भरती होईल.

शिक्षक होण्यासाठी आता ‘टेट’ बंधनकारकच

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दोन लाख १६ हजार ४४३ विद्यार्थ्यांच्या ‘टेट’चा निकाल २४ मार्च रोजी जाहीर केला. त्यात जवळपास २६ हजार विद्यार्थ्यांना दोनशेपैकी १००पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. त्या उमेदवारांना आता त्यांचे प्रोफाइल तयार करावे लागणार आहे. दरम्यान, पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शिक्षक म्हणून अर्ज करणारा उमेदवार ‘टीईटी’ उत्तीर्ण झालेला असावा. तर कोणत्याही शाळांवर शिक्षक होणारा उमेदवार ‘टेट’ उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. त्याशिवाय शिक्षक भरतीसाठी त्या उमेदवाराला अर्जच करता येत नाही.