नदी, नाले तुडुंब

नदी, नाले तुडुंब

पुणे - मध्य महाराष्ट्र, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आष्टे येथे ३९०  मिलिमीटर, तर रत्नागिरीतील शिरगाव येथे ३४० मिलिमीटर पाऊस पडला. राज्यातील २५ हून अधिक ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. जोरदार पावसामुळे राज्यातील नद्या-नाल्यांना पूर आले असून, धरणांच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे.

राज्यात सर्वदूर संततधार पाऊस कोसळत आहे. सलग तिसऱ्या दिवशी राज्यात दमदार पाऊस पडल्याने धरणातील पाण्याच्या साठ्यात झपाट्याने वाढ झाली. नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा जिल्ह्यांतील प्रमुख नद्या पूररेषेवरून वाहत आहेत. गेले वर्षभर पाणी कपातीशी झुंजणाऱ्या राज्यातील नागरिकांना यंदा नैॡत्य मौसमी पावसाने (मॉन्सून) दिलासा दिल्याचे चित्र सध्या राज्यात दिसत आहे.

झारखंड आणि ओडिशाच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र सध्या आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुढील चोवीस तासांमध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सोमवारी काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. 

उत्तर महाराष्ट्रात दमदार पाऊस

नाशिकमध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सोमवारी संध्याकाळच्या साडेपाच वाजेपर्यंत १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. गेल्या आठवड्यापर्यंत ओढ दिलेल्या धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर चांगला होता. 

मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथे सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. कोल्हापूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पाऊस सुरू होता. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली होती. कोयना धरणात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी संध्याकाळपर्यंत पावसाची रिपरीप सुरू होती. महाबळेश्‍वर येथे पावसाचा जोर जास्त होता. त्यामुळे या कोयना धरणाच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत आहे. सांगली जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. 

विदर्भात पावसाचा कहर

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. दोन दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस पडत असल्याने नद्यांना पूर आले आहे. गडचिरोली येथील पर्लकोटा नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. यवतमाळमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसाने सायखेडा येथील मध्यम प्रकल्पातून पाणी वाहू लागले आहे. 

मराठवाड्यात हजेरी

सलग दोन वर्षे दुष्काळात होरपळणाऱ्या मरावाड्यातील जिल्ह्यांना यंदा पावसाने दिलासा दिला आहे. बीडमध्ये तर तेथील सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, लातूर, परभणी या भागात पावसाने हजेरी लावली आहे. 

झाडाने वाचविले तिघांचा जीव

दर्यापूर (अमरावती) ः रस्ता पार करण्याच्या प्रयत्नांत अकोल्याचे डॉ. सुरेश मुंदडा यांची कार लासूर तोंगलाबादजवळील गायठी नाल्यातील पुरात अडकली. वाहून जाणाऱ्या त्यांच्या कारला बाभळीच्या झाडाने आसरा दिला आणि काही क्षणात वाहून जाणारी त्यांची कार झाडाला अडकली. त्यामुळे तिघांचे प्राण वाचले.

राज्यातील पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये सकाळी ८.३० ते रात्री ८.३०)

पुणे .. ९

जळगाव .. ८

कोल्हापूर ... ५१

महाबळेश्‍वर .. १३३

नाशिक .. १३

सांगली .. ४२

सातारा .. २७

रत्नागिरी .. १५

भिरा .. ४५

परभणी .. ५१

अकोला .. २५

बुलडाणा .. २६

ब्रह्मपूर .. २१

चंद्रपूर .. २०

वाशीम .. ५५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com