क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना 'गुगल'ची आदरांजली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई : देशातील पहिल्या महिला शिक्षक, समाजसेविका, वंचितांसाठी आवाज उठविणाऱ्या सावित्रीबाईंची आज 186 वी जयंती आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'गुगल'ने डूडलच्या माध्यमातून सावित्रीबाईंना आदरांजली वाहिली आहे.

मुंबई : देशातील पहिल्या महिला शिक्षक, समाजसेविका, वंचितांसाठी आवाज उठविणाऱ्या सावित्रीबाईंची आज 186 वी जयंती आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 'गुगल'ने डूडलच्या माध्यमातून सावित्रीबाईंना आदरांजली वाहिली आहे.

गुगल डूडलच्या माध्यमातून कर्तृत्ववान व्यक्तींना आदरांजली वाहिली जाते. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंनी मोलाची साथ दिली. त्यांचे स्मरण देशभरात सर्वत्र करण्यात येते. गुगलनेही खास करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. सावित्रीबाईंच्या जयंतीनिमित्त आज राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 1. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. 
 2. 1840 मध्ये 9 वर्षांच्या असताना 13 वर्षीय जोतिराव फुले यांच्याशी विवाह झाला. 
 3. पती जोतिराव फुले यांच्यासोबत मिळून मुलींसाठी 18 शाळा सुरू केल्या. पहिली आणि अठरावी शाळाही पुण्यात उघडली. 
 4. देशातील स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या नेत्या.
 5. देशातील पहिल्या महिला शिक्षक
 6. 28 जानेवारी 1853 रोजी बलात्कार पीडित, गर्भवती महिलांसाठी त्यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. 
 7. एक प्रगल्भ शिक्षिका म्हणून 1852 सालीच सरकार दरबारी सावित्रीबाईंचा सन्मान
 8. 1854 साली सावित्रीबाईंचा 'काव्यफुले' हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.
 9. सावित्रीबाईंनी 19व्या शतकामध्ये स्पृश्य-अस्पृश्य, सती प्रथा, बालविवाह आणि विधवा विवाह निषेध अशा रुढींविरुद्ध आवाज उठविला. 
 10. काशीबाई या विधवा ब्राह्मण महिलेला आत्महत्येपासून परावृत्त करून सावित्रीबाईंनी तिचे आपल्या घरात बाळंतपण केले, आणि तिचा मुलगा यशवंत याला दत्तक घेऊन त्याचा सांभाळ करून त्याला डॉक्टर बनविले. 
 11. 1890 मध्ये महात्मा जोतिराव फुले यांचा मृत्यू.
 12. 10 मार्च 1897 रोजी प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू.
 13. सावित्रीबाईंचे संपूर्ण आयुष्य वंचित वर्गाच्या आणि खास करून महिला व दलितांच्या हक्कांसाठी संघर्ष करण्यात व्यतीत झाले. 

सावित्रीबाई फुले यांच्या कविता...
तयास मानव म्हणावे का?
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?
दे रे हरी पलंगी काही
पशूही एेसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव म्हणावे का?
---

स्त्रीशोषण व पुरुषप्रधान संस्कृतीवर प्रहार 

रूप तियेचे करी विच्छिन्न
नकोसे केले तिजला त्याने
शोषून काढी मध तियेचा
चिपाड केले तिला तयाने
---

सावित्री- जोतिबा संवाद

काळरात्र गेली। अज्ञान पळाले।।
सर्वा जागे केले। या सूर्याने ।।
शूद्र या क्षितीजी।
जोतिबा हा सूर्य ।।
तेजस्वी अपूर्व। उगवला।।

(संकलन- संग्राम जगताप)

Web Title: google doodle tribute to savitribai phule