विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

सरकार स्थापन करून विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने भाजपला विरोधात बसावे लागणार आहे. भाजपमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई - सरकार स्थापन करून विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने भाजपला विरोधात बसावे लागणार आहे. भाजपमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. 

राज्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपला 105 जागा मिळाल्या आहेत. तरीही सरकार स्थापन करण्यात अपयश आले असून, शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाआघाडीच्या वतीने मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव निश्‍चित झाले आहे. यामुळे भाजपला विरोधात बसावे लागणार आहे. यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी नेमकी कोणाची वर्णी लागेल, याबाबत चर्चा सुरू आहे. 
भाजपने फडणवीस यांनाच विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती.

त्यामुळे साहजिकच फडणवीस यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडेल असे सांगितले जात असले, तरी पक्षात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडलेले सुधीर मुनगंटीवार यांचे नाव आघाडीवर आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही ही संधी मिळू शकते. भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या जवळचे चंद्रकांत पाटील असल्याने ऐनवेळी त्यांचीही वर्णी विरोधी पक्षनेतेपदावर लागू शकते, असे बोलले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government BJP Opposition Party leader Politics