सरकारी इमारतींना वीजबचतीचा "स्पर्श'

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 एप्रिल 2018

मुंबई - राज्य शासनाच्या "स्पर्श' (सोलर पॉवर अँड रिनोव्हेटिव्ह सस्टेनेबल हब) प्रकल्पांतर्गत राज्यातील 1,269 शासकीय इमारती ऊर्जा कार्यक्षम करण्यात आल्या असून, त्यामुळे एक एप्रिलपर्यंत सुमारे दहा लाख युनिट विजेचा वापर कमी झाला आहे. तसेच, वीजबिलापोटीचे 92.68 लाख रुपयांची बचत झाली आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय इमारतींमधील दोन लाख ट्यूबलाइट, 75 हजार पंखे व 1,600 वातानुकूलित यंत्रे बदलण्यात आली आहेत.

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय इमारतींमधील जुनी विद्युत उपकरणे बदलून ऊर्जा सक्षम उपकरणे बसविण्याचा "स्पर्श' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व शासकीय इमारतींच्या छतांवर व परिसरातील मोकळ्या जागेत सौरऊर्जा निर्मितीची सयंत्रे बसविण्यात येणार असून, त्यामार्फत राज्य शासनाच्या इमारतींमध्ये सौर विद्युत निर्मिती करण्यात येणार आहे.

सरकारी इमारतीतील अनेक उपकरणे जुनी असल्याने मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. त्यामुळे "स्पर्श' हा उपक्रम हाती घेतला. यासाठी राज्य शासन व केंद्राची "ईईएसएल' कंपनी यांच्यात 24 ऑक्‍टोबर 2017 रोजी करार करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सुमारे 307 कोटी रुपये एवढी भांडवली गुंतवणूक करण्यात येणार आहे.

शासकीय इमारतींमधील उपकरणामुळे मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते व वीज देयकामध्येही मोठा खर्च होतो. "स्पर्श'मुळे शासनाच्या इमारतील वीज वापरात बचत होणार असून, वार्षिक सुमारे 120 दशलक्ष युनिट्‌स विजेची बचत होणार आहे, तर वीज देयकामध्येही दरवर्षी सुमारे 114 कोटी रुपये वाचणार आहेत.
- चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री

Web Title: government building electricity saving sparsh project