धनगर आरक्षणावरून आता सरकारची कोंडी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मुंबई - मराठा आरक्षणाची धग अजून कायम असतानाच राज्यातील धनगर समाजाच्या आज राज्यभरात आंदोलनाचा वणवा पेटल्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतून या आंदोलनावर लक्ष ठेवून असून, आंदोलन शांत करण्यासाठी विविध उपाययोजनांवर सरकारची कार्यवाही सुरू आहे.

सकल मराठा मूक मोर्चाचे ठोक मोर्चात रूपांतर झाल्यानंतर गेली दोन आठवडे राज्यभरात मराठा आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले होते. हे आंदोलन शांत करण्यासाठी समाजातील विविध घटकांत काम करणाऱ्या मान्यवरांची मदत राज्य सरकारला घ्यावी लागली होती. तरीही आंदोलन शांत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार हतबल झाले होते. मराठा आंदोलनाची धग अद्याप कायम असताना राज्यभरातील धनगर समाजाने आजपासून आंदोलनाचे हत्यार उपसले.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज राज्यातील सर्वच जिल्ह्यांत आंदोलने झाली. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यास मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. आता चार वर्षांच्या सत्तेनंतरही धनगर आरक्षणाचा ठोस असा निर्णय होत नसल्याने हा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यातच औरंगाबाद जिल्ह्यात साहेबराव चौधरी या व्यक्‍तीने गळफास लावून आत्महत्या केल्याने राज्य सरकारचे धाबे दणाणले आहेत. राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यांवर रास्ता रोको करण्याबरोबरच आंदोलकांनी शेळ्या-मेंढ्या रस्त्यावर उतरवून चक्‍काजाम केला.

Web Title: government confuse by dhangar reservation