'मराठी टिकवण्याची जबाबदारी सरकारची नाही'

'मराठी टिकवण्याची जबाबदारी सरकारची नाही'

नागपूर : मराठीसाठी शासनाने काहीतरी करावे, हे नाठाळ आणि आळशीपणाचे लक्षण आहे. सरकारने भाषेसाठी मंडळे स्थापन केली आहेत. माणसे नेमली आहेत. भाषा टिकविण्याची मुख्य जबाबदारी मध्यमवर्गाची आहे, सरकारची नाही, असे स्पष्ट मत ज्येष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांनी आज व्यक्त केले.

जागतिक मराठी संमेलनात साहित्यिक डॉ. श्रीकांत तिडके आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुळकर्णी यांनी प्रा. एलकुंचवार यांची प्रकट मुलाखत घेतली. मराठीविषयी ते म्हणाले, की आपण सहज मराठी बोलतो का, याचा विचार करा. दूरचित्रवाहिनीवर खाद्यपदार्थ तयार करण्याचे शो असतात. त्यात माहिती देणारी स्त्री क्रियापद वगळता एकही मराठी शब्द बोलत नाही. कसले आले मराठीवरचे आक्रमण? "प्राथमिक व माध्यमिक शाळेपर्यंत उत्कृष्ट मराठी शिक्षक दिले, तरच चित्र बदलेल. प्राथमिक शिक्षकांचे पगार तर सर्वाधिक असायला हवे; कारण त्यांच्यावरच मुख्य जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.

लेखकाचे महत्त्व नाही 
भारतीय समाजात लेखक दुय्यम म्हणजे बिनमहत्त्वाचीच गोष्ट आहे. ज्या समाजात असे चित्र असेल त्या समाजाची प्रकृती बरी नाही, असे मी समजतो. लेखकाने स्वतःची प्रतिष्ठा ठेवून घ्यावी, कुणीतरी आपली प्रतिष्ठा ठेवावी, अशी मुळीच अपेक्षा करू नये, असेही ते म्हणाले. 

जगणं हाच अग्रक्रम 
लिहिणे किंवा नाटक माझ्या जगण्याचा अग्रक्रम कधीच नव्हता. जगणं हाच माझ्या जीवनाचा अग्रक्रम होता. लेखकाने जीवनाशी खेळायचंच असतं. गाणारा सुरांशी खेळतो; पण लेखकाला जगण्याशीच खेळायचं असतं. जगलोच नाही, तर लेखनासाठी मूलद्रव्ये कुठून मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

पुरस्कार वापसी 
काही दिवसांपूर्वी नयनतारा सेहगलसह काही लोकांनी पुरस्कार परत केले. त्यावर कुठल्याही सुसंस्कृत सरकारने पुरस्कार परत करणाऱ्यांकडे खेद व्यक्त करून चर्चेसाठी बोलावणे अपेक्षित होते. मात्र सरकारकडून टिंगलटवाळी झाली या लोकांची. नयनतारा सेहगल यांनी पुरस्कार परत केल्यावर साहित्य अकादमीच्या लोकांनी 25 हजार रुपये आणि पुरस्कार देऊन आम्ही तुम्हाला मोठं केलं, अशी भूमिका घेतली. त्यावर सेहगल यांनी व्याजासकट एक लाख रुपये सरकारला परत केले, अशी खंत प्रा. एलकुंचवार यांनी व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com