'मोफत औषधे देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जानेवारी 2017

नेरुळ - केंद्र सरकार नागरिकांच्या आरोग्याबाबत संवेदनशील असून, प्रत्येक भारतीयाला मोफत औषधे देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी आज येथे दिली.

नेरुळ - केंद्र सरकार नागरिकांच्या आरोग्याबाबत संवेदनशील असून, प्रत्येक भारतीयाला मोफत औषधे देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी आज येथे दिली.

नवी मुंबईतील नेरुळ येथे डी. वाय. पाटील विद्यापीठाचा अकरावा पदवीदान समारंभ झाला. त्यात आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे, प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, परराष्ट्र मंत्रालयातील सचिव ज्ञानेश्वर मनोहर मुळे, प्रसिद्ध अभियंते मनोहर तारकुंडे, "सिद्धा आयुर्वेदा'चे तज्ज्ञ के. वासू यांना डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली. त्या वेळी कुलस्ते प्रमुख पाहुणे होते. पदवीदान समारंभाला बिहार व त्रिपुराचे माजी राज्यपाल व संस्थापक कुलपती डॉ. डी. वाय. पाटील, कुलपती डॉ. विजय पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिरीष पाटील आदी उपस्थित होते.

कुलस्ते म्हणाले, ""शिक्षण व आरोग्य क्षेत्रात क्रांतीची गरज आहे. परिवर्तनासाठी शिक्षण क्षेत्र वेगाने पुढे नेण्याची आवश्‍यकता आहे. विविध खासगी आरोग्य संस्थांना व विद्यापीठांना परवानग्या घेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सर्व नागरिकांनी मिळून देशवासीयांच्या आरोग्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे.'' डी. लिट प्राप्त करणाऱ्या गौरवमूर्तींनी आपापल्या क्षेत्रात केलेल काम खूप मोलाचे आणि अतुलनीय असल्याचेही ते म्हणाले.

""आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होत असले तरी, आयुर्वेदिक उपचाराला आणि भारतीय संस्कृतीचा आजही जगभर आदर केला जातो. आयुर्वेद, योग, आध्यात्म, संगीत या क्षेत्रात 35 वर्षे अविरतपणे समाजकार्य करत आहे. देशविदेशांत या सर्वच क्षेत्रांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे,'' असे प्रतिपादन या वेळी आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांनी केले. ""आयुर्वेद, योग, आध्यात्म, संगीत या क्षेत्रांत केलेल्या कामगिरीमुळेच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने डी. लिट पदवी देऊन सन्मानित केले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा सन्मान आयुर्वेद, योग, आध्यात्म, संगीत यांचा आहे. या सर्वांना आता वेगळे अधिष्ठान प्राप्त झाले आहे,'' असेही डॉ. श्री बालाजी तांबे म्हणाले.

विद्वान मंडळींच्या मांदियाळीत कला क्षेत्राशी निगडित असणाऱ्या कलाकाराला डी. लिट पदवीने गौरविण्यात आले, हे मी माझे भाग्य मानतो. माझ्या प्रतिक्रिया माझ्या गाण्यातूनच पोचवत आहे, असे सांगत सुरेश वाडकर यांनी "तुमसे मिल के...' हे सुमधुर गीत सादर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

गौरवमूर्तींच्या कार्याचा सन्मान - डॉ. श्री बालाजी तांबे
वैद्यविशारद डॉ. श्री बालाजी तांबे हे नैसर्गिक आरोग्य, आयुर्वेद, योगासने, औषधोपचार, संगीतोपचार आणि जीवनकौशल्ये या क्षेत्रांत 50 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. आयुर्वेद, योग, ध्यानधारणा या माध्यमातून मानवी मन आतून निर्मळ करण्याचे कार्य ते करीत आहेत. त्यांनी विकसित केलेली संतुलन पंचकर्म थेरपी लोकप्रिय आहे. आयुर्वेद, योग, रामायण यातून परिपूर्ण जीवनशैली व्यवस्थापन, वेदातील मंत्रांचे विवेचन, गर्भसंस्कार, पंचकर्म आणि श्रीमद्‌भगवतगीता या संदर्भात 55 पुस्तके लिहिली आहेत. "सोम प्रोग्राम ः कम्युनिकेशन विथ द सेल्फ' या पुस्तकाच्या जर्मन भाषांतराच्या तीन महिन्यांत पाच हजार प्रतींची विक्री झाली.

प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर
गेली 35 वर्षे गायन क्षेत्रात कार्यरत आहेत. हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड अशा विविध भाषांमधील 500 चित्रपटांत पार्श्‍वगायन केले आहे. पाच वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित.

परराष्ट्र मंत्रालयातील सचिव ज्ञानेश्‍वर मुळे
कोल्हापूर जिल्ह्यातील सामान्य कुटुंबात जन्म. अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिवपदापर्यंत झेप.

अभियंते मनोहर तारकुंडे
उजणी धरण, चंद्रपूरमधील औष्णीक ऊर्जा प्रकल्प, तिलारी धरण आदी महत्त्वाचे प्रकल्प उभारण्यात मोलाचे योगदान. पर्यावरणप्रेमी म्हणून ओळख. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले.
के. वासू
1965 मध्ये बंगळूर येथे जन्म. आठव्या वर्षांपासून आयुर्वेदाविषयी कुतूहल. त्यानंतर आयुर्वेदीक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य. 30 देशांत त्यांचे समाजकार्य सुरू आहे.

Web Title: Government efforts to free medicines