'सरकार १२० कोटी रुपयांची तरतूद करणार'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जून 2019

बारामती शहर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

बारामती शहर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामासाठी तातडीने लागणारे पंधरा कोटी रुपये त्वरित देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. दरम्यान, बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या कामासाठी एकूण २८० कोटी रुपयांची आवश्‍यकता असल्याची बाब शरद पवार व अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. हे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय वेळेत सुरू झाले तर त्याचा फायदा या परिसरातील सर्व नागरिकांना होईल, ही बाबदेखील निदर्शनास आणून देण्यात आली. 

मुख्यमंत्र्यांनीही तातडीने ही रक्कम मंजूर करून येत्या अधिवेशनामध्ये बारामतीच्या महाविद्यालयासाठी १२० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही या वेळी दिली. उर्वरित कामेदेखील वेगाने मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली. तसेच महाविद्यालयाच्या वसतिगृहासह इतर सर्व प्रलंबित कामे वेगाने मार्गी लावण्याच्या सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.   या प्रसंगी डॉ. वाकोडे, डॉ. संजय मुखर्जी, अर्थ विभागाचे सचिव व्यास व बारामतीचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय कुमार तांबे हेही उपस्थित होते.दरम्यान, या महत्त्वाच्या बैठकीनंतर आता बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता ऑगस्ट महिन्यात सुरू होऊन पहिल्या १०० विद्यार्थ्यांना या महाविद्यालयात प्रवेश मिळेल, हे आता निश्‍चित झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The government has made a provision of Rs 120 crore