शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत रुग्णखाटांच्या प्रमाणात मनुष्यबळ हवे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

मुंबई - राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध रुग्णखाटांच्या प्रमाणात अध्यापक वर्ग व विद्यार्थी संख्या वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले असून त्याबाबतचा कृती अहवाल तीन महिन्यांत सादर करण्यासही सांगितले आहे. 

मुंबई - राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध रुग्णखाटांच्या प्रमाणात अध्यापक वर्ग व विद्यार्थी संख्या वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले असून त्याबाबतचा कृती अहवाल तीन महिन्यांत सादर करण्यासही सांगितले आहे. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांत पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचा दर्जा वाढवणे, अध्यापक डॉक्‍टरांवरील कामाचा ताण कमी करणे, उपलब्ध सोई-सुविधांचा पूर्ण क्षमतेने उपयोग करणे आणि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे या बाबी यामुळे शक्‍य होणार आहेत. रुग्ण आणि डॉक्‍टरांच्या हिताबरोबरच डॉक्‍टरांच्या सेवा व कर्तव्यामध्ये समतोल साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री म्हणून आपण पाठपुरावा करत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे. 

वैद्यकीय शिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे निर्माण करताना संबंधित महाविद्यालयांतील फक्त विद्यार्थीसंख्या विचारात घेतली जाते. ही विद्यार्थीसंख्या ठरवताना संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात आवश्‍यक रुग्णखाटांचे किमान प्रमाण भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने ठरवून दिले आहे. तथापि, राज्यात बहुतांश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने ठरवून दिलेल्या रुग्णखाटांपेक्षा कितीतरी जास्त खाटा उपलब्ध असून सर्व रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते. अतिरिक्त रुग्णखाटांची सेवा करताना डॉक्‍टरांवर, वैद्यकीय विद्यार्थ्यांवरही ताण येतो. त्यामुळे रुग्णसेवेचा दर्जा टिकवण्यासाठी व डॉक्‍टरांवरील ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले आहेत. 

रुग्णखाटांचे प्रमाण अधिकच 
भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत एक हजार रुग्णखाटा असल्यास तेथे 200 विद्यार्थीसंख्या असे प्रमाण आवश्‍यक आहे. प्रत्यक्षात 200 एमबीबीएस विद्यार्थीसंख्या असलेल्या नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक हजार 401 रुग्णखाटा, पुण्याच्या बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत एक हजार 296; तर मुंबईतील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन हजार 895 रुग्णखाटा आहेत. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 150 विद्यार्थीसंख्या असून 750 रुग्णखाटांची आवश्‍यकता असताना प्रत्यक्षात एक हजार 177 रुग्णखाटा आहेत. धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 100 विद्यार्थी संख्येमागे 500 रुग्णखाटा आवश्‍यक असताना प्रत्यक्षात 545 रुग्णखाटा आहेत. म्हणजेच अतिरिक्त रुग्णखाटांकरिता समप्रमाणात अध्यापक, वैद्यकीय विद्यार्थी, मनुष्यबळ यांची आवश्‍यकता आहे. हा समतोल साधण्याकरिता मनुष्यबळ निर्मिती करण्याचे आणि त्याचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 

Web Title: Government Medical Colleges have a handicap for patients