शिवसेनेशिवायही सरकार पाच वर्षे चालणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

मुंबई - शिवसेना आज आमच्यासमवेत असल्याचे मी गृहित धरतो आहे. मात्र, उद्या ती सोबत नसली तरी महाराष्ट्राचे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केला. कुठल्याही आमदाराला निवडणूक नको असल्याने सरकारला कोणताही धोका कसा असेल, असे सूचक उद्‌गार त्यांनी काढले. उद्धव ठाकरेंसारख्या ज्येष्ठ नेत्याकडूनही अर्धवटरावसारखे अपशब्द सहन करण्याची तयारी राजकारणात ठेवावी लागतेच. मात्र प्रचाराची दिशा भरकटवण्याऐवजी त्यांनी आपल्या शहराचा विकास कसा करणार, याविषयी बोलणे आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. 

राज्यातील "मिनी विधानसभा' निवडणुकांबाबत निवडक पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की 10 महापालिका आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप सर्वत्र क्रमांक एकवर रहाणार हे निश्‍चित आहे. प्रचारात सरकारवरचा विश्‍वास दृढ होताना दिसतो आहे. शेतकऱ्यांना सरकारच्या योजनांवर, विजेच्या उपलब्धतेवर कमळाला मत द्यावेसे वाटत आहे. परिवर्तन दिसते आहे. 

शिवसेनेचे मंत्री प्रचाराच्या अखेरच्या सभेत उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामे सादर करणार असल्याच्या चर्चेकडे लक्ष वेधताच मुख्यमंत्री म्हणाले, की आमच्या सभेतील मुद्दे जनतेपर्यंत पोचू नयेत यासाठी अशी खेळी केली जाईल. मात्र जनतेला अशा भावनिक, प्रचारकी थाटापेक्षा विकासासाठी कोण काय करणार, हे जाणून घेण्यात रस असतो. शिवसेनेला आपला विरोध नाही; पण त्यांच्या कार्यपद्धतीला आपला नक्‍कीच विरोध आहे. पक्ष कुठला का असेना पारदर्शी कारभाराला विरोध करण्याची वृत्ती समजण्यासारखी कशी असेल, असा प्रश्‍नही त्यांनी केला. 

मुंबई मराठी माणसाची आहे. ती मराठी माणसाच्याच हाती असेल, याबद्दल निष्कारण बुद्धिभेद करणाऱ्यांनी हार्दिक पटेलला मुंबईत आणून नवी मते मिळवणे तर दूर; पण स्वत:च्या वोट बॅंकेलाच दूर केल्याची टीकाही त्यांनी केली. शिवसेना यापुढे होणाऱ्या निवडणुकांत आमच्याबरोबर असेल का, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. हिंदुत्व या वैचारिक आधारावर आम्ही एकत्र आलो; पण आता त्यांची हिंदुत्वाची व्याख्या बदलली आहे की काय, असा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. 

प्रादेशिक पक्षांचा महासंघ निर्माण करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले, की कोणत्याही आघाडीला समान कार्यक्रमाची गरज असते. मुस्लिम समाजाचे लांगूलचालन करणाऱ्या ममता बॅनर्जींशी शिवसेना हातमिळवणी करणार आहे की काय? 

कलंकित उमेदवारांवरून अप्रचार 
भाजपची लाट असताना आपण कलंकित आणि अन्य पक्षांतील उमेदवारांना का जवळ घेतलेत, या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, की आम्ही कलंकित उमेदवार घेतले, हा अपप्रचार आहे. या वेळी प्रथमच आम्ही बहुतांश ठिकाणी स्वबळावर लढतो आहोत. पूर्वी युती असायची. नव्याने निर्माण झालेली विजयी पक्षातील संधी लक्षात घेत अनेक बाहेरची मंडळी आमच्याकडे आली. त्यातील आवश्‍यक वाटले त्या ठिकाणी बाहेरच्या मंडळींना उमेदवारी दिली गेली. 

Web Title: government run for five years with our shiv sena