सरकार करणार मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सन्मान

दीपा कदम
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

कामगार आणि कष्टकऱ्यांच्या लढ्याला प्रेरणा देणाऱ्या लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या उद्यापासून (एक ऑगस्ट) सुरू होणाऱ्या जन्मशताब्दीनिमित्ताने राज्य सरकारने मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : कामगार आणि कष्टकऱ्यांच्या लढ्याला प्रेरणा देणाऱ्या लोकशाहीर कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या उद्यापासून (एक ऑगस्ट) सुरू होणाऱ्या जन्मशताब्दीनिमित्ताने राज्य सरकारने मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे.

अण्णा भाऊंच्या मार्गावर चालणाऱ्या कार्यकर्ते, शाहिरांचा सत्कार करताना हे कार्यकर्ते मात्र मातंग समाजातीलच असतील, याची खबरदारी राज्य सरकार घेणार आहे. अण्णा भाऊ साठे यांनी "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव' अशा ओळीतून जग बदलण्याचा संदेश दिला होता. अशा महान शाहिराला जातीत बंदिस्त करणे हे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व छोटे करणारे असून कष्टकरी, कामगार चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि कलावंतांचा यानिमित्ताने सत्कार करण्याची मागणी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. 

पुढील दीड महिन्यातच विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागणार असल्याने मातंग समाजाला समोर ठेवून तातडीने काही कार्यक्रम राज्य सरकार हाती घेणार आहे. त्यामध्ये मातंग समाजातील 100 कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी दिली. ते म्हणाले की, अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी निमित्ताने राज्य सरकारने 100 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे, असे ते म्हणाले. 

राज्य सरकारने 100 मातंग कार्यकर्त्यांचा सत्कार करण्याविषयी कॉ. सुबोध मोरे यांनी तीव्र आक्षेप घेतला. ""अण्णा भाऊंनी "जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव' अशा ओळीतून जग बदलण्याचा संदेश दिला होता. अशा महान शाहिराला जातीपुरते बंदिस्त करणे हे त्यांचे व्यक्‍तिमत्त्व छोटे करणारे आहे,'' असे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government will honor 100 activists of Matang community