esakal | देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा - जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil

सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, आज देशातील आघाडीच्या अनेक कंपन्यांची उत्पादन क्षमता ५० टक्‍क्‍यांवर आलेली आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा - जयंत पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाटोदा (जि. बीड) - सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, आज देशातील आघाडीच्या अनेक कंपन्यांची उत्पादन क्षमता ५० टक्‍क्‍यांवर आलेली आहे. या कंपन्या दिवाळखोरीत निघत असून, या कंपन्या मोठ्या संख्येने कर्मचारी कपात करीत आहेत. त्याच्या झळा सर्वसामान्य माणसाला बसत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. 

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त पाटोदा येथे रविवारी जाहीर सभा झाली. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, आज दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांमध्ये काम करणारे बहुतांश तरुण हे ग्रामीण भागातील आहेत. आज त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड सरकारच्या आर्थिक नीतीने कोसळली आहे. 

भाजप-शिवसेनेला धडकी - डॉ. कोल्हे
खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, की शिवस्वराज्य यात्रेला राज्यभरात मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भाजप व शिवसेनेला धडकी भरली आहे. पाच वर्षांत भाजपने सर्वच बाबतीत जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाला विविध नऊ खात्यांचे राज्यमंत्रिपद दिले होते; मात्र सत्तेच्या उबीमुळे काही जणांनी दुसरीकडे उड्या मारल्या; आता मात्र निर्णयाची वेळ आली आहे. दरम्यान, गेवराई शहरातही जाहीर सभा झाली. या वेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, परळीपेक्षा गेवराई मतदारसंघात विजयसिंह पंडित आमदार झाल्यानंतर मला दहापट जास्त आनंद होईल.

loading image
go to top