महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचे वारे; जूनमध्ये ग्रामपंचायतीची रणधुमाळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

सरपंचपदांच्या रिक्त जागा
ठाणे - १, पालघर - २, रायगड - १०, रत्नागिरी - ५, सिंधुदुर्ग - १, नाशिक - ३, नगर - १, नंदुरबार - २, पुणे - ३, सोलापूर - १, सातारा - ६, औरंगाबाद - ४, नांदेड - ८, उस्मानाबाद - २, परभणी - १, वाशीम - ५, बुलडाणा - १, चंद्रपूर - १ आणि भंडारा - ५. एकूण - ६२.

मुंबई - राज्यातील विविध २० जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक ; तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६ हजार ७१९ सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी २३ जून २०१९ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सोमवारी येथे दिली.

सहारिया यांनी सांगितले की, जुलै २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सार्वत्रिकसह सर्व निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज ३१ मे २०१९ ते ६ जून २०१९ या कालावधीत स्वीकारले जातील. २ व ५ जून २०१९ या दोन सुटीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. छाननी ७ जून रोजी होईल. अर्ज १० जूनपर्यंत मागे घेता येतील.

त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान २३ जून रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी ७.३० पासून दुपारी ३.०० पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी २४ जून रोजी होईल.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या - पालघर - ७, रायगड - ८, रत्नागिरी- १, नाशिक - ७४, धुळे - १, जळगाव - १, नगर - १०, पुणे - ३, सातारा - ३, सांगली - १, कोल्हापूर - १, उस्मानाबाद - १, लातूर - २, नांदेड - १, अकोला - १, यवतमाळ - ३, वाशीम - १, बुलडाणा - १, वर्धा - ४ आणि चंद्रपूर - २२. एकूण - १४६.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grampanchyat Sarpanch Election Member Politics