मद्य तस्करी रोखण्यासाठी ग्रामरक्षक देणार साथ !

भूषण पाटील
रविवार, 15 जुलै 2018

ग्रामरक्षक दल संकल्पना प्रभावीपणे राबणार आहे. त्यासाठी जास्तीत जास्त गावांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे. ग्रामपंचायतीनी उपक्रमास प्रतिसाद दिल्यास लोकसहभागातून मद्यतस्करी सारखे गुन्हे रोखता येतील. 

- गणेश पाटील, अधीक्षक उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर विभाग. 

कोल्हापूर : गावातील अवैद्य मद्य तस्करी रोखण्यासाठी तसेच छुपी मद्य केंद्रे उद्‌ध्वस्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ग्रामरक्षक दलांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी विभागाचे अधिकारी गावागावात जाऊन प्रबोधन करत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद ही मिळत आहे. ग्रामरक्षक दलासाठी ग्रामसभेचा विशेष ठराव आवश्‍यक असल्याने 15 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त गावात पोचण्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा प्रयत्न आहे. 

गावात येणाऱ्या आपत्तीचा सामना करता यावा यासाठी केंद्र सरकारने ग्रामरक्षक दल उपक्रमाची सुरवात केली आहे. ग्रामसभांमध्ये ग्रामरक्षक दलाचे सदस्य निवडून त्यांना आवश्‍यक प्रशिक्षक दिले जात आहे. याच धर्तीवर आता राज्य सरकारने मद्य तस्करी रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल स्थापनेचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी गावा गावात जाऊन लोकांची भेट घेत आहेत. अवैद्य मद्य तस्करी विरोधात सविस्तर माहिती देऊन त्यांचे प्रबोधन करत आहेत. कोल्हापूर विभागाने या उपक्रमात आघाडी घेतली आहे. 

गोवा राज्यातून महसूल चुकवून मोठ्या प्रमाणावर मद्याची तस्करी केली जाते. मद्य तस्करीची मोठी साखळीच राज्यभरात कार्यरत आहे. या साखळीच्या माध्यमातून मद्य गावागावापर्यंत पोचवले जात आहे. हे प्रकार टाळण्यासाठी लोकांचीच मदत घेण्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा प्रयत्न आहे. 

अशी असेल रचना 
* गावाच्या लोकसंखेच्या तुलनेत ग्रामरक्षक दलाच्या सदस्यांची संख्या, पण ती 11 पेक्षा नसेल 
* महिला तसेच सर्व जातींच्या लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्यत्व 
* किमान तीन महिन्यांतून एकदा बैठक 
* दोन वर्षे कार्यकाळ. 

Web Title: GramRakshak will withhold liquor to prevent smuggling