ग्राउंड रिपोर्ट : ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग बिकटच; ‘या’ समस्या ऐकुन तुम्ही व्हाल थक्क

अशोक मुरुमकर
Thursday, 25 June 2020

शैक्षणिक वर्ष वेळेतच सुरु करा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान फक्त कागदावर राहिले आहे. कोरोना व्हायरसच्या सावटामुळे जून संपत आला तरी शाळा कधी सुरु होणार हे निश्‍चित झालेले नाही. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणावर भर देण्याचा प्रयोग सरकार देत आहे. मात्र, हा प्रयोग किती यशस्वी होईल हे अनुत्तरीत आहे.

सोलापूर : आमच्याकडे मोबाईल आहे पण तो साधा... पुस्तकं येणार असं एकलंय पण नाहीत मिळाली अजून आम्हाला... कुठं मिळणार आहेत? ना शाळेतून फोन आला ना कोणी सांगितलंयं... सध्या पेरणीची काम सुरु आहेत, आधी तेच बघणार... त्यावरचं आमचं चालतयं सगळं... ऑनलाइन शिक्षण हा शब्द सुद्धा अजून ‘त्यांच्या’पर्यंत व्यवस्थित पोचला नसल्याचे वास्तव ‘सकाळ’च्या पाहणीत समोर आले आहे.
शैक्षणिक वर्ष वेळेतच सुरु करा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधान फक्त कागदावर राहिले आहे. कोरोना व्हायरसच्या सावटामुळे जून संपत आला तरी शाळा कधी सुरु होणार हे निश्‍चित झालेले नाही. अशा स्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणावर भर देण्याचा प्रयोग सरकार देत आहे. मात्र, हा प्रयोग किती यशस्वी होईल हे अनुत्तरीत आहे. ग्रामीण भागात शिक्षणाबाबत एक ना अनेक समस्या आहेत. शाळा सुरु करण्यास अडचणी आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या. शाळा कधी सुरु होणार हे निश्‍चित नसले तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अभ्यास करण्यासाठी पुस्तके द्या, असंत सांगण्यात आले. याबरोबर डिजीटल शिक्षणासाठी ‘शैक्षणिक दिनदर्शिका’ सर्वांपर्यत पोहच करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र, यातील काहीच ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाही.

हेही वाचा : घरी बसून ‘असा’ करा अभ्यास; ३२५ पानात तीन महिन्याचा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
विद्यार्थी म्हणतायेत...

नवनाथ खराडे हा सहावीतील विद्यार्थी म्हणाला, मी गावापासून १० किलोमिटरवर करमाळ्यात तालुक्याच्या ठिकाणी शाळेत जातो. लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा शाळेला सुट्टी जाहीर झाली. त्यानंतर जसा जून जवळ येईल तसं शाळा सुरु होण्याचे वेध लागले. शाळा कधी सुरु होणार हे समजत नाही. पण गावातील काहीजण म्हणतात ऑनलाइन शिक्षण सुरु होणार आहे. पण आमच्याकडे आहे साधा मोबाईल. मग कस समजणार मला काय. अन्‌ त्याला कधी रंज येते तर कधी येत नाही. काहीजण खासगी शाळांमध्ये आहेत. त्यांना पुस्तक मिळाली. हे ऐकुन मीच स्वत: मॅडमला फोन करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला पुस्तक मिळतील असं सांगण्यात आलं. पण कधी मिळणार हे नाही समजलं. फोन आला तर कामातून सुद्धा पप्पांना पुस्तक आणायला सांगेल पण, फोन आलाच नाही. अन्‌ मला जायचे तर कसं जाणार साधणही नाहीत जायाला. यावर मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. आणि गेल्यावर्षी सहावीला कोण होत हे पाहून त्याच्याकडून पुस्तक घेण्याचा निर्णय घेतला. गावात चौथीपर्यंत शाळा आहे. तेथील शिक्षकांना पुस्तकांबद्दल विचारले तर तुमच्या शाळेतून पुस्तक मिळतील असं सांगण्यात आलं. आमच्याकडे स्मार्ट फोनच नसल्यामुळे डिजीटल शैक्षणिक सांहित्य कस मिळणार आणि मिळाले तरी कसं वापरणार? नवनाथचे आई- वडील मजुरी करतात. त्यांना थोडी शेती आहे. त्यावरच त्यांची उपजिवीका होते. त्याला एक भाऊ व बहिण आहे. ते दोघेही करमाळ्यातच शाळेत असतात. त्यांच्याही शिक्षणबाबात अशीच स्थिती आहे.

हेही वाचा : पालकांसाठी महात्त्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून आरटीईचे प्रवेश होणार सुरु 
माऊली म्हणाला, आमच्या घरात जास्त शिक्षण झालेले कोणच नाही. पण आम्ही शिकाव अशी त्यांची इच्छा आहे. दरवर्षी शाळा सुरु झाली की, शैक्षणिक साहित्य घेतात. यंदा मात्र, अजून शैक्षणिक साहित्य नाही. घरात कोणाकडे मोठा मोबाईलही नाही. आई- वडील शेती करतात. शिक्षणासाठी नवीन मोबाईल घेण्याची खूप इच्छा आहे. पण काय करणार, शेतात कांदा पडून आहे. त्याला दर नाही. कोरोनामुळे सर्व घटकांवर परिणाम झाला. मोबाईल घेण्यासाठी पैसे नाहीत. सध्या घर खर्च भागवणे आवघड झाले आहे. अशा स्थितीत कसं शिकायचा हा प्रश्‍न आहे.
सुप्रिया शेळके म्हणाली,  शाळा तर बंदच आहेत. टिव्हीवर अभ्यासक्रम दिसणार असं सांगितलं जातंय पण कोणत्या चॅनेलवर हे माहिती नाही. वडीलांकडे स्मार्टफोन आहे. पण त्यात अभ्यासक्रम आला नाही. मग अभ्यास कसा करायचा?

आर्थिक नियोजनच नाही : शिरसट
महाराष्ट्र राज्य शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष संभाजीराव शिरसाट म्हणाले, सरकार ऑनलाइन शिक्षण सुरू करावे, असा आदेश देऊन मोकळे झाले आहे. परंतु त्याबाबतचे नियोजन तसेच  आवश्यक उपाययोजनेसाठी कोणतीही आर्थिक तरतूद केलेली नाही. शिक्षण विभागामध्येही कोणताही याबाबत समन्वय नाही. सध्या शाळांमधील शिक्षक स्वतः मोबाईलवर शैक्षणिक चित्रफित तयार करून विद्यार्थांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु इंटरनेट व इतर अनुशंगीन भौतिक सुविधेचा अभाव असल्याने ग्रामीण भागात व प्रत्येक विद्यार्थांना शिक्षण घेता येत नाही. अनेक ग्रामीण भागात अजुनही शिक्षकाना ऑनलाइन शिक्षण सुरू करता आले नाही. सरकारने शिक्षणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा सुरू होण्यापूर्वीच डिजीटल चॅनेल्सद्वारे शिक्षण देण्याबाबत नियोजन केले असते तर १०० टक्के विद्यार्थापर्यत शिक्षण पोहचले असते. कायमच सरकार शिक्षणाकडे दुय्यम स्थान म्हणून पाहते.  त्या शिक्षणाबाबत काही आर्थिक तरतुदीचा विषय आला की टाळाटाळ केली जाते. चॅनेल्सवर शिक्षण देणे ही बाब अतिशय योग्य असतानाही त्याचा आर्थिक भार लागेल, यामुळे हेतुपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. त्याप्रमाणे शिक्षण विभागाचे नियोजनही नाही. अर्थात आर्थिक तरतूदीशिवाय नियोजनही शक्य नाही. हे ही तितकेच सत्य आहे. आता तरी विद्यार्थी हित लक्षात घेता सरकारने यापुढील काळात नियोजन करून ऑनलाइन शिक्षणाची दिशा ठरवेल, अशी आशा बाळगू.

हेही वाचा : महत्त्वाची बातमी : शाळा सुरु करताना पालक, शिक्षक, ग्रामपंचायतीवर ‘ही’ असणार जबाबदारी
शाळांची स्थिती

कोरोना व्हायरसची भिती ग्रामीण भागातून कमी झालेली नाही. शाळा सुरु करण्यासाठी सरकारने स्थानिक पातळीवर निर्णय घण्याबाबत प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. त्याचे संभाव्य वेळापत्रकही सरकारने जाहीर केले आहे. त्यानूसार शाळा सुरु करण्यासाठी शिक्षक, सरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती प्रयत्न करत आहे. मात्र, काही ठिकाणी विद्यार्थी येत नसल्याचे चित्र आहे. यातूनच शाळांची स्वच्छता करण्याचे काम सुरु आहे. काही ठिकाणी बाहेर गावातून आलेल्यांना शाळा होम क्वारंटाईनासाठी देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्या शाळा स्वच्छ करण्याचे काम केले जात आहे. यासाठी डेस्क बाहेरकाढून सर्व वर्ग सॅनिटाईझ केल्या जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ground report of the government online education order on the background of Corona