"जीएसटी'चे राज्यातील अधिवेशन पुढे ढकलले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

मुंबई - जीएसटी कायदा केंद्र सरकारने पारित केला असला तरी राज्यांनी जीएसटीसंदर्भातील कायद्यासाठी राज्य सरकारच्या वतीने 17 मे रोजी बोलाविलेले विशेष अधिवेशन देशपातळीवरील विशेष बैठकीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. मुंबईत 20, 21 आणि 22 मे 2017 रोजी होईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वतीने श्रीनगर येथे 18 आणि 19 मे रोजी "जीएसटी'संदर्भात विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणत्या वस्तू "जीएसटी' कायद्यात समाविष्ट करायच्या आणि करनिश्‍चितीबाबत चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत. राज्याच्या वतीने अर्थमंत्री म्हणून आपण या बैठकीला उपस्थित राहणार आहोत. राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी निर्णय घेतल्याप्रमाणे राज्य सरकारचे विशेष अधिवेशन हे 17 मे 2017 रोजी सुरू होणार होते; परंतु श्रीनगर येथील विशेष बैठकीमुळे राज्यातील विशेष अधिवेशन आता 20 मे रोजी सुरू होईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. 

शिवसेनेच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दोन दिवसांचे अधिवेशन घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले, की राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर दोन दिवसांत चर्चा पूर्ण होणे अशक्‍य आहे. त्यासाठी 30 दिवसांचे अधिवेशन घ्यायला हवे. जुलै महिन्यातील पावसाळी अधिवेशनात सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे मत त्यांनी मांडले. 

Web Title: GST postponed the state convention