महाराष्ट्रात ४८ खासदार, १६० आमदारांचे लक्ष्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

गुहागर - राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढील निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे ४८ खासदार व १६० आमदार निवडून आणण्याचे निश्‍चित केले आहे. त्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघाचा समावेश हवा. या मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता येण्यासाठी जोमाने काम करावे, असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुहागर दौऱ्यात गुहागर व चिपळूण येथील भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे निराश झालेल्या कार्यकर्त्यांना उत्साह देण्याचे काम त्यांनी केले. यापुढे सर्व निवडणुका स्वबळावरच लढायच्या आहेत. त्यासाठी संघटन मजबूत असणे आवश्‍यक आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात विस्तारक पाठविला जाणार आहे. त्याच्याबरोबर काम करताना आवश्‍यक माहिती प्रामाणिकपणे द्या. सभासद वाढविण्यासाठी सहकार्य करा. मोदी व फडणवीस यांनी सार्वत्रिक विकासासह वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना राबवल्या आहेत. 

ग्रामपंचायतीला निधी दिला आहे. यातून विकासकामांची गती वाढली आहे. या सर्व मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी बुथस्तरावर संघटन मजबूत केले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने जनतेतून सरपंच निवडून देण्याचा घेतलेला निर्णय ग्रामीण भागाच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे. याकरिता ग्रामपंचायतीमध्ये आपली सत्ता असणे गरजेचे आहे. पक्षसंघटना मजबूत असेल तर विजय दूर नाही. बूथ स्तरावरील संघटन मजबूत करत २ ते ३ महिन्यावर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये विजय मिळविण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे. असे आवाहन रवींद्र चव्हाण यांनी केले. 

या वेळी भाजपचे कोकण संघटनमंत्री सतीश धोंड, जिल्हाध्यक्ष बाळ माने, महिला प्रदेश चिटणीस नीलम गोंधळी, जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिरगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण, यशवंत बाईत, जिल्हा चिटणीस श्रीकांत महाजन, चिपळूण तालुकाध्यक्ष रामदास राणे, गुहागर तालुकाध्यक्ष विठ्ठल भालेकर यांच्यासह गुहागर व चिपळूण तालुक्‍यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: guhagar maharashtra news 48 mp & 160 mla