Sadabhau Khot : 'शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळण्यासाठी महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू करा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadabhau Khot

राज्य शासनाने संवेदनशीलपणे मागण्यांचा विचार करावा, अन्यथा थेट मंत्रालयी येऊन जाब विचारू, असा इशाराही खोत यांनी दिला आहे.

Sadabhau Khot : 'शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळण्यासाठी महाराष्ट्रात गुजरात पॅटर्न लागू करा'

सातारा : राज्यात कुठलंही सरकार सत्तेत आलं तरी शेतकऱ्यांची लूट थांबत नाही. त्यामुळे सत्ताकारणात गुरफटलेल्या राजकारण्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या वतीने २२ मे रोजी कऱ्हाड ते सातारा यादरम्यान ‘वारी शेतकऱ्यांची’ ही पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पदयात्रेदरम्यान सरकारने चर्चेस न बोलविल्यास सातारवरून थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. खोत म्हणाले, 'गेल्या काही दिवसांत सामान्य जनतेचा आवाज कुठेही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदना सरकारच्या वेशीवर टांगण्याचे काम ‘वारी शेतकऱ्यांची’ या पदयात्रेच्या माध्यमातून करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये प्रती टन उसाला तीन हजार रुपये भाव मिळत असताना गुजरात राज्यात साडेचार हजार मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळण्यासाठी गुजरात पॅटर्न (Gujarat Pattern) महाराष्ट्रात लागू करावा.'

तसेच सहकारी साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा होण्यासाठी दोन कारखान्यांमधील २५ किलोमीटरचे हवाई अंतर कमी करावे. मूठभर लोकांच्या हितासाठी अस्तित्वात असलेला जमीन तुकडाबंदी कायदा रद्द करावा. बारसू रिफायनरी प्रकल्प शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर उभा राहताना अनेकदा शेतकऱ्याला पैसे देऊन गप्प बसविले जाते. मात्र, आता बारसू प्रकल्पात शेतकऱ्याच्या जमिनी जात असतील तर त्याला कंपनीत भागधारक बनवावे. त्यामुळे नफ्यातील रक्कम दर महिन्याला शेतकऱ्याच्या कुटुंबाला मिळेल, असंही खोत म्हणाले.

शेतकऱ्यांच्या (Farmer) या प्रश्‍नांच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्यासाठी कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळाला अभिवादन करून यात्रा तीन दिवसांच्या मुक्कामानंतर साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करणार आहे. यादरम्यान राज्य शासनाने संवेदनशीलपणे मागण्यांचा विचार करावा, अन्यथा थेट मंत्रालयी येऊन जाब विचारू, असा इशाराही खोत यांनी दिला आहे. यावेळी सचिन नलावडे, आनंद जाधव, समाधान पोफळे, प्रकाश साबळे, संजय शेलार, मधुकर जाधव उपस्थित होते.