मोसम खोरे बनले गुजरातची 'परसबाग' 

दीपक खैरनार
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

जायखेड्यात वाहतूक व्यावसायिकांच्या दहा कंपन्या असून, त्यांचे शंभर ट्रक शेतीमालाच्या वाहतुकीसाठी धावतात. याशिवाय इतर खेड्यांमध्ये शंभरहून अधिक पिकअप व्यावसायिक आहेत. गुजरातकडे रात्री नऊला जायखेड्यामधून भाजीपाला भरलेले ट्रक रवाना होतात.

अंबासन (जि. नाशिक) : 'गुजरातची परसबाग' म्हणून मोसम खोरे नावारूपाला आले आहे. बागलाण तालुक्‍यातील जायखेडा पंचक्रोशीतून सुरत, भडोच, बडोदा, अहमदाबादकडे सध्या दिवसाला साठ लाखांचा दहा ट्रक भाजीपाला रवाना होत असून, पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या हंगामात दिवसाला 500 टन भाजीपाला शेतकऱ्यांकडून गुजरातकडे पाठविला जाण्याचा अंदाज आहे. शाश्‍वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी शेडनेड, पॉलिहाउसचा अवलंब केल्याने शेतीमालाच्या वाहतुकीच्या व्यवसायाला बरकत आली आहे. 

जायखेड्यात वाहतूक व्यावसायिकांच्या दहा कंपन्या असून, त्यांचे शंभर ट्रक शेतीमालाच्या वाहतुकीसाठी धावतात. याशिवाय इतर खेड्यांमध्ये शंभरहून अधिक पिकअप व्यावसायिक आहेत. गुजरातकडे रात्री नऊला जायखेड्यामधून भाजीपाला भरलेले ट्रक रवाना होतात. पहाटे सुरत, भडोच, बडोदा, अहमदाबादमध्ये ट्रक पोचताच भाजीपाल्याच्या विक्रीला सुरवात होते. या विक्रीतून रोजच्या रोज पैसे मिळत असल्याने भाजीपाल्याच्या उत्पादनात सातत्य राखणे शक्‍य होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

एका ट्रकमागे एक चालक, एक क्‍लीनर आणि पाच हमाल इतक्‍या मनुष्यबळाला भाजीपाल्याच्या वाहतुकीतून रोजगार मिळत आहे. जायखेड्यामधून थेट गुजरातमधील बाजारपेठेत भाजीपाला पाठवण्यासाठी शेतकरी एक ट्रकचे पंधरा हजार रुपयांपर्यंत भाडे मोजतात. मोसम खोऱ्यातील भाजीपाला वेळेत येत असल्याने भाज्यांचे भाव अजून टिकून असल्याचे गुजरातमधील बाजार समित्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

भाजीपाल्याने तारले 
वरुणराजाची कृपादृष्टी होण्याअगोदर नामपूर, अंतापूर, दसवेल, ब्राह्मणपाडे, जायखेडा, आसखेडा या परिसरांतील शेतकऱ्यांना दुष्काळाने ग्रासले होते. मात्र तशाही परिस्थितीत भाजीपाल्याने शेतकऱ्यांना तारले. या भागातून वांगी, टोमॅटो, भेंडी, गवार, कोथिंबीर, कोबी, मिरची, मेथी, दुधीभोपळा, शेवगा, गिलके, कारली असा भाजीपाला गुजरातला जातो. सध्या सुरू असलेला पाऊस आणि वांगी व टोमॅटोला कीडरोगाने ग्रासले असल्याने भाजीपाल्याची आवक सहा ट्रक एवढी मंदावली आहे. पुढच्या महिन्यापासून फ्लॉवर, कोबीची आवक वाढेल आणि दिवाळीपर्यंत वाहतूक व्यवसायाला तेजीचे दिवस राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gujarats Parasbagh becomes Mosam Valley