गुरुदास कामत सर्व पदांवरून मुक्त

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई - कॉंग्रेस नेते व गांधी घराण्याचे निष्ठावंत कार्यकर्ते गुरुदास कामत यांना आज कॉंग्रेसने सर्व पदांवरून मुक्त केले. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी संजय निरुपम यांची निवड केल्यानंतर ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. गुजरातच्या प्रभारीपदाचा त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. मात्र तो स्वीकारण्यात आलेला नव्हता.

आज मात्र कामत यांच्या मागणीचा कॉंग्रेसने स्वीकार करत त्यांना पक्षातील सर्व महत्त्वाच्या जबाबदारीतून मुक्त केले.

कामत हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, लवकरच ते कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देतील, असा दावा केला जात आहे. मुंबईत गुरुदास कामत हे कॉंग्रेसचे सर्वाधिक वजनदार नेते मानले जातात. मात्र महापालिका निवडणुकीत त्यांना डावलण्यात आले होते. त्यावरून कामत व निरुपम असा संघर्ष पेटला होता. कॉंग्रेसने यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले; पण कामत सहमत झाले नाहीत.

फेब्रुवारीपासूनच त्यांनी वारंवार कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे जबाबदारीतून मुक्त करा, यासाठी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. आज कॉंग्रेस अध्यक्षांच्या निर्णयाचे कामत यांनी स्वागत करत पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले.

Web Title: Gurudas Kamat is free from all posts