
H3N2 Virus : ‘एच३एन२’चा नगरमध्ये पहिला बळी
नगर : नगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणाचा सोमवारी (ता. १३) रात्री हिवतापाच्या ‘एच३एन२’ विषाणूमुळे मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचे नमुने खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात आले होते.
त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, ‘एच३एन २’मुळेच या रुग्णाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे आरोग्य विभागासह प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मृत्यू झालेला संबंधित तरुण मूळ छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे.
काही दिवसांपूर्वी तो पर्यटनासाठी अलिबाग येथे जाऊन आला होता. त्यानंतर त्याची तब्येत बिघडली. त्यामुळे उपचारासाठी तो शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. तेथे त्याला कोविड असल्याचे निष्पन्न झाले.
उपचारांदरम्यान सोमवारी (ता. १३) रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्याला कोविड आणि हिवतापाचा संसर्ग झाल्याचे तपासणीतून समोर आले आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई : राज्यात ‘एच३एन२’ विषाणूच्या संसर्गामुळे दोन मृत्यू झाल्याने आणि लक्षणे असलेले रुग्ण आढळून आल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणेला सज्ज करण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज एका निवेदनाद्वारे विधानसभेत दिली.
राज्यात या आजार मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील शहरी भागात आढळून आला आहे. नगरमध्ये सोमवारी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर नागपूरमध्ये नऊ मार्चलाही एका ७२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता, अशी माहिती सावंत यांनी दिली. हिवताप या आजाराबात सावध राहण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणांना दिल्याचे त्यांनी सांगितले.