गुजरातमध्ये शिवसेनेचा "हार्दिक' चेहरा! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

मुंबई - गोवा, उत्तर प्रदेश पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धक्का देण्यासाठी शिवसेना गुजरातमधील विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहे. त्यासाठी गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे प्रमुख हार्दिक पटेल यांना पुढे केले जाणार आहे. हार्दिक पटेल गुजरातमधील "शिवसेनेचा चेहरा' होऊ शकतो, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कौटुंबिक संबंधातून आपण शिवसेनेसोबत राहू, असे हार्दिक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मोदी आणि भाजपविरोधी शिवसेना - पटेल एकत्र येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

हार्दिक यांनी आज "मातोश्री' येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत हार्दिक यांनी ही भेट कौटुंबिक असल्याचे सांगितले. हार्दिक शिवसेनेच्या प्रचारात सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र त्याचा त्यांनी इन्कार केला. गुजराती आणि मराठा समाजाच्या भेटी घेत असून, यात कोणताही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र शिवसेनेशी आमचे कौटुंबिक संबंध आहेत. न्यायासाठी आणि राजकीय परिवर्तनसाठी आम्ही त्यांच्यासोबत राहू, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. भाजपने आमच्या 14 जणांची हत्या केली. माझ्यावर दोन देशद्रोहाचे गुन्हे आहेत. त्यामुळे त्यांना आमचा विरोध आहे. आम्हाला भयमुक्त सरकार हवे आहे, असेही हार्दिक म्हणाले. 

शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढवणार का, असा प्रश्‍न उद्धव यांना विचारला असता गुजरातमधील नागरिकांची मागणी असेल तर नक्की लढू, आमची आणि भाजपची राज्याबाहेर युती नव्हती. तरीही आम्ही निवडणूक लढवत नव्हतो. आता आम्ही गोवा व उत्तर प्रदेशात निवडणूक लढवत आहोत. हार्दिक पटेल आमचा गुजरातमधील चेहरा असेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

तुम्ही भाजपला टार्गेट करण्यासाठी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहात का, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता÷"आम्ही भाजपविरोधात निवडणूक लढवत आहोत, असे नाही; भाजप आमच्या विरोधात निवडणूक लढत आहे', अशी कोपरखळी या वेळी उद्धव यांनी मारली. 

"शेर शेर होता है...' 

ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर हार्दिक यांनी बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. तसे छायाचित्र शिवसेनेकडून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. हार्दिक यांच्या भेटीची शिवसेनेने जोरदार वातावरणनिर्मिती केली आहे. "शेर जंगल मे रहे या पिंजरे मे, शेर शेर ही होता है, इनको किसकी जरुरत नाहीं, यह लोगो की मदत करता है' अशी स्तुतिसुमने हार्दिक यांनी ठाकरे कुटुंबीयांवर उधळली. त्यांचे हे विधानही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

Web Title: hardik patel in shiv sena