शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक; हार्दिक मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

संजय मिस्किन
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे माझे आदर्श असल्याचे हार्दिक पटेल यांनी यापूर्वीच अनेकवेळा जाहीर केले आहे. मात्र, राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाण्याचे त्यांनी आतापर्यंत टाळले होते.

मुंबई - भाजप व शिवसेना यांच्यात टोकाचे मतभेद आता राजकीय मतभेदात रुपांतरीत झाल्याचे स्पष्ट झाले असून, गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज (मंगळवार) मातोश्रीवर थेट शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल शिवसेनेच्या संपर्कात आल्यामुळे भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मुंबईतील गुजराती उमेदवारांच्या प्रचारात देखील आज हार्दिक सहभागी होणार आहे. उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर हार्दिक पटेल हे गुजरातमध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले आहे. हार्दिक पटेल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे नतमस्तक झाल्याचे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे, की आजही मातोश्रीवर वाघाची डरकाळी ऐकायला मिळते. चांगल्या लोकांशी चर्चा करणे आणि त्या लोकांपर्यंत घेऊन जाणे चांगली गोष्ट आहे. खरंच बाळासाहेब एक वाघ होते. बाळासाहेबांना मी नमन: करतो.

शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे माझे आदर्श असल्याचे हार्दिक पटेल यांनी यापूर्वीच अनेकवेळा जाहीर केले आहे. मात्र, राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाण्याचे त्यांनी आतापर्यंत टाळले होते. आज पहिल्यांदाच हार्दिक अखेर शिवसेनेच्या संपर्कात आल्याने मुंबईसह गुजरातच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: hardik patel will be shiv senas face in gujarat polls says uddhav thackeray