
Hasan Mushrif : ईडीच्या साडेनऊ तासाच्या झाडाझडतीनंतरही हसन मुश्रीफ नॉट रिचेबल!
राज्याचे माजी मंत्री, राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी काल ईडीने छापेमारी केली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काल तब्बल साडेनऊ तास ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरी झाडाझडती केली आहे. यावेळी आमदार हसन मुश्रीफ घरी नव्हते. ईडीच्या या छापेमारीनंतर मुश्रीफ यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
या घटनेनंतर तब्बल 24 तास उलटले असले तरी हसन मुश्रीफ यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांनी कुणाशीही संपर्क साधलेला नाही. तसेच आपलं म्हणणंही त्यांनी मांडलं नाही. मुश्रीफ संपर्काबाहेर असल्याने मुश्रीफ गेले कुठे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
नलावडे साखर कारखाना प्रकरणी काल ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. गेल्या दीड महिन्यातील ही तिसरी छापेमारी होती. सकाळी सात वाजता ईडीचे पाच ते सहा अधिकारी कागल येथील मुश्रीफ यांच्या घरी आले आणि त्यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली. यावेळी मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुश्रीफ यांच्या घरातील लोकांनाही बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.
तर ईडी कारवाईच्या 24 तासानंतरही आमदार हसन मुश्रीफ संपर्काबाहेर आहेत. या प्रकरणी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुश्रीफ यांचा सीए सुद्धा ईडीच्या रडारवर असल्याची माहिती आहे. तसेच ईडीकडून मुश्रीफ यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स देण्यात आलंय. त्यामुळे मुश्रीफ उद्या चौकशीला सामोर जाणार की वकीलामार्फत बाजू मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हसन मुश्रीफ त्यांच्या विविध कंपन्यांमार्फत झालेल्या कथेत घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. दीड महिन्यांपूर्वी हसन मुश्रीफ राहत असलेल्या कागल इथल्या निवासस्थानी ईडीने छापा टाकून दिवसभर त्यांच्या घराची झाडाझडती घेतली होती. तसेच कुटुंबीयांची देखील कसून चौकशी केली होती.
कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती साखर कारखाना, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक या संस्थांमध्ये हसन मुश्रीफ यांच्यामार्फत कथित घोटाळा झाल्याची तक्रार ईडीकडे प्राप्त झालेली होती.
तसेच हसन मुश्रीफ यांनी विविध बोगस कंपन्यां मार्फत फसवणूक केल्याचा आरोप ही त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये हसन मुश्रीफ आणि त्यांच्या दोन्ही मुलांची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र ही चौकशी सुरू झाल्यापासून आता हसन मुश्रीफ नॉट रिचेबल झालेले आहेत.