स्वाईन फ्ल्यूचा कहर, 24 दिवसांमध्ये 16 बळी 

The havoc of swine flu, 16 dead  in 24 days
The havoc of swine flu, 16 dead in 24 days

नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी आज विशेष आढावा बैठक घेत तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. 

प्रशांत कुलकर्णी यांना गेल्या गुरुवारी (ता.13) जिल्हा सरकारी रुग्णालयात स्वाईन फ्ल्यू विशेष कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांचा वैद्यकीय अहवाल "पॉझिटिव्ह' होता. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आज सकाळी साडेदहाला त्यांचा मृत्यु झाला. जिल्हा रुग्णालयाच्या विशेष स्वाईन फ्ल्यू कक्षामध्ये 21 रुग्ण दाखल असून यापैकी 12 रुग्णांना स्वाईन फ्ल्युची लागण झाली आहे. उर्वरित रुग्णांचे वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. "पॉझिटिव्ह' रुग्णांमध्ये 9 पुरुष व 3 महिलांचा समावेश आहे. तसेच विशेष कक्षामध्ये दाखल रुग्णांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील 13 रुग्ण आहेत. 

नाशिकमध्ये अधिक फैलाव 
स्वाईन फ्ल्युने दगावलेल्या 18 रुग्णांमध्ये 6 रुग्ण हे नाशिक महापालिका क्षेत्रातील, 10 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. चांदवड, येवला, निफाड, मालेगाव या तालुक्‍यातून अधिक रुग्ण दाखल होत आहेत. नाशिकमधील इंदिरानगर, पंचवटी, जेलरोड भागातील रुग्ण संख्या अधिक आहे. आत्तापर्यंत दगावलेल्या 22 रुग्णांमध्ये स्वाईन फ्ल्यू व्यतिरिक्त चार रुग्ण हे निमोनिया, क्षयरोगाने दगावले आहेत. 

घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांची माहिती घ्या : डॉ. कांबळे 
जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युमुळे दगावलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यास वेळीच अटकाव करण्यासाठी ग्रामपातळीवर अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या व आरोग्यसेविकांना घरोघरी जाऊन तापाच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना डॉ. कांबळे यांनी दिल्यात. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी आरोग्य विभागाच्या संपर्कात राहून उपचार करावेत. तालुकास्तरावर खासगी रुग्णालयांच्या बैठका घेऊन स्वाईन फ्ल्युला अटकाव करण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा सरकारी रुग्णालयास भेट देत आढावा बैठक घेतली आणि त्यांनी स्वाईन फ्ल्यू विशेष कक्षाला भेट दिली.

बैठकीसाठी सहसंचालक डॉ. प्रकाश भोये, नाशिक विभागाच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारे यांच्यासह जिल्ह्यातील उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. 

महापालिका रुग्णालयाने द्यावी सुविधा 
जिल्हा सरकारी रुग्णालयात नाशिक महापालिका क्षेत्रातून स्वाईन फ्ल्युसदृश्‍य तापाचे रुग्ण दाखल होताहेत. त्यामुळे महापालिकेने त्यांच्या रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्ल्यू कक्ष सुरू करून औषधांचा साठा उपलब्ध करण्याच्या सूचना महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कोठारे यांना यावेळी आरोग्य संचालकांनी दिल्या. 

स्वाईन फ्ल्यू बळींची संख्या 
राज्य : 54 
नाशिक जिल्हा : 10 
नाशिक महापालिका क्षेत्र : 6 
नाशिकमधील इतर जिल्ह्याचे : 2 

राज्यातील आजाराची स्थिती 
रुग्णांची स्वाईन फ्ल्यू तपासणी : 13 लाख 93 हजार 299 रुग्ण 
स्वाईन फ्ल्यू सदृश्‍य ताप : 17 हजार 454 रुग्ण 
स्वाईन फ्ल्युबाधित रुग्ण : 446 
डेंग्युचे बळी : 9 
स्क्रब टायपसचे बळी : 11 

"ताप आल्यास तो अंगावर न काढता तत्काळ डॉक्‍टरांकडे जावे. खासगी रुग्णालयांनाही तापाच्या रुग्णांना "टॅमी-फ्ल्यू' देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच "टॅमी-फ्ल्यू'चा पुरेसा साठाही उपलब्ध आहे. संसर्गजन्य असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.'' 
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com