
कोरोनाबाबत काळजी घ्या; राजेश टोपे
मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारची चिंताही पुन्हा वाढू लागली आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले. दिल्लीतील स्थिती पाहता महाराष्ट्रात काळजी घ्यावी लागणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले.
रुग्णसंख्या पाहून गरजेनुसार उपाय करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मात्र, कोणतीही बंधने न लादण्याची भूमिका आहे. कोरोनाविरोधी नियम पूर्णपणे मागे घेतल्यानंतर आता देशातील काही राज्यांत या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे आकडे पुढे येत आहेत. त्यामुळे काही भागांत मास्क पुन्हा बंधनकारक करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सावध राहण्याचे आवाहन करून केंद्र सरकारने राज्यांना पत्रेही पाठवली आहेत. त्यातच मुंबई, पुणे, नाशिक आणि नगरमधील सक्रिया रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढत होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना धास्तावली आहे.
कोरोनाचा संसर्ग आणि उपायांवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्याबाबतची माहिती टोपे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. टोपे म्हणाले, ‘‘मुंबईत रोज साधारपणे ८० ते ८५ रुग्ण वाढत आहेत. तर राज्यभरात १३५ रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लोकांना वैयक्तिक पातळीवर काळजी घ्यावी लागणार आहे. लसीकरण वाढविण्यासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना सूचना केल्या आहेत. १२-१५ आणि १५- १८ वयोगटातील मुलां-मुलींच्या लसीकरणाला प्राधान्य आहे.’’
नवे १६२ रुग्ण
राज्यात बुधवारी १६२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,७६,२०३ झाली आहे. मंगळवारी १३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२७,६८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ६९० सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात बुधवारी एकही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के आहे.
दिल्लीत पुन्हा मास्कची सक्ती
कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता राजधानी दिल्लीत पुन्हा निर्बंध लादण्यास सुरवात झाली असून, तोंडाला मास्क लावणे सरकारने सक्तीचे केले आहे. मास्क न लावणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (डीडीएमए) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, शाळा बंद न करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. शाळा चालवण्यासाठी तज्ज्ञांकडून घेतलेल्या सल्ल्यानुसार स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) लागू केली जाईल. दिल्ली सरकार लवकरच ‘मास्क’च्या अनिवार्य वापराबाबत अधिकृत आदेश जारी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Web Title: Health Minister Rajesh Tope Appeals To Citizens Take Care Corona Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..