म्हैसाळ येथील गर्भपात केंद्रास आरोग्यमंत्री भेट देणार 

म्हैसाळ येथील गर्भपात केंद्रास आरोग्यमंत्री भेट देणार 

मुंबई - म्हैसाळ (जि. सांगली) येथील अवैध गर्भपात केंद्र चालवणाऱ्या डॉक्‍टर पती-पत्नीच्या अत्याचाराच्या कहाण्या उजेडात येत आहेत. अवैध गर्भपात करताना एका महिलेचा मृत्यू झाला असून, यास जबाबदार असलेल्या डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याला अटक झाली आहे. आपण बुधवारी (ता.8) घटनास्थळी भेट देऊन सभागृहात निवेदन करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. या प्रकरणाचा तपास योग्यरीतीने सुरू असून, लवकरच आणखी काही जणांना अटक केली जाईल, अशी पुष्टी त्यांनी जोडली. 

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षांनी त्यांना हा स्थगनचा विषय होत नाही, असे सांगत खाली बसवण्याचा प्रयत्न करताना माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील बोलायला उठले. ते म्हणाले, हा विषय स्थगनचा होत नसला तरी, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे इतर कामकाज बाजूला ठेवून यावर सभागृहात चर्चा व्हावी. 

राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. वाशीम जिल्ह्यात एका दलित महिलेवर अत्याचार करून तिला जिवंत जाळण्यात आले. यात तिचा मृत्यू झाला, तर सांगली जिल्ह्यात म्हैसाळ गावात गर्भपात करताना महिलेचा मृत्यू झाला. याबाबत गृहमंत्र्यांनी तेथे भेट दिली का?, सरकारने याबाबत कोणती कारवाई केली? यास महिला व बालकल्याण, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री जबाबदार नाहीत का? हे मंत्री जबाबदारी स्वीकारून राजीनामे देणार का? असे प्रश्‍न वळसे पटील यांनी उपस्थित केले. 

यानंतर जयंत पाटील यांनीही या तीन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पाटील बोलत असताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ""दोषींवर सरकार कठोर कारवाई करणार आहे. त्यानंतर डॉ. सावंत उत्तर देण्यासाठी उठले. ते म्हणाले, ही घटना अत्यंत गंभीर आहे. राज्यात अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही निदर्शनास आल्या आहेत. या प्रकरणाचा पोलिस तपास करत करत आहेत. तपास योग्य दिशेने सुरू आहे. लवकरच आणखी काही जणांना अटक केली जाईल. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, कोल्हापूर, मिरज आदी भागातील डॉक्‍टरांची साखळी काम करीत आहे. मी उद्या म्हैसाळला भेट देणार असून, यानंतर पुढील तपासाबाबत सभागृहात निवेदन करणार आहे. 

परिचारकप्रकरणी भाजपने हात झटकले 
देशाच्या सीमा सुरक्षित ठेवणाऱ्या सैनिकाच्या व त्याच्या पत्नीविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांच्यापासून भाजपने आज जाहीरपणे हात झटकले. परिचारक यांच्याशी "आमचा संबंध नाही', असे स्पष्टीकरण देत परिषदेचे सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजप परिचारक यांची पाठराखण करणार नसल्याचे निर्देश दिले. मात्र, गेल्या पंधरा दिवसांत त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित करीत विरोधकांनी कामकाज रोखून धरले. सभापती रामराजे निंबाळकर यांनीही परिचारक यांच्या वक्‍त्यव्यावर नाराजी व्यक्त करत ही गंभीर बाब असून, हा "नैतिकते'चा प्रश्न असल्याचे सांगत सभागृह दिवसभरासाठी स्थगित केले. 

आमदार प्रशांत परिचारक यांचे कायमस्वरूपी निलंबन व्हावे, यासाठी विरोधकांनी सलग दुसऱ्या दिवशी परिषदेचे कामकाज रोखून धरले. परिचारक यांच्या कायमस्वरूपी निलंबनाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी आणावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. दरम्यान, सत्ताधारी भाजप पुरस्कृत असलेल्या परिचारक यांच्यापासून भाजपने अंतर राखत सरकार परिचारक यांचे समर्थन करीत नाही. अशा वक्तव्याचे समर्थन करणारा "गाढव' असेल, अशा शेलक्‍या शब्दात चंद्रकांत पाटील यांनी परिचारक यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. नीलम गोऱ्हे, नारायण राणे, शरद रणपिसे, भाई जगताप यांच्यासह विरोधी पक्षाच्या सर्वच सदस्यांनी परिचारक यांची परिषदेतून कायमची हकालपट्टी करण्याची मागणी केली. 

शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी आजही याविषयी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. एकाबाजूला आपण सर्जिकल स्ट्राइकविषयी आक्रमक भूमिका घेणार आणि जवानांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणार, असा भाजपला थेट टोला लगावला. तसेच हे प्रकरण वैयक्तिक माफीच्या पलीकडे असून, सरकारने स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गोऱ्हे यांनी केली. मात्र, आजही मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार नसल्याने सभागृहाची भावना लक्षात घेऊन सभापतींनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com