राज्यात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 एप्रिल 2017

पुणे - राज्याचा बहुतांश भाग उन्हाच्या चटक्‍यात होरपळून निघत आहे. पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणांसह विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामान खात्याने रविवारी (ता. १६) वर्तविली. येत्या मंगळवारपर्यंत (ता. १८) उष्णतेची ही लाट कायम राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक म्हणजे ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पुणे - राज्याचा बहुतांश भाग उन्हाच्या चटक्‍यात होरपळून निघत आहे. पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणांसह विदर्भात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता हवामान खात्याने रविवारी (ता. १६) वर्तविली. येत्या मंगळवारपर्यंत (ता. १८) उष्णतेची ही लाट कायम राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक म्हणजे ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

पश्‍चिम राजस्थान, हरियाना, चंडिगड, पंजाब या भागांत उष्णतेची मोठी लाट निर्माण झाली आहे. तेथून उष्ण आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्याचा थेट परिणाम राज्यातील तापमानवाढीवर झाला आहे. यादरम्यान, राज्याच्या हवेत बाष्पाचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका वाढल्याचे निरीक्षण हवामान खात्यातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत, तर विदर्भाच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तापला
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागांत कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. मध्य महाराष्ट्रातील बारा शहरांपैकी महाबळेश्‍वर आणि कोल्हापूर वगळता इतर सर्व ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदले जात आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली. पुढील दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहण्याची शक्‍यता आहे.

विदर्भात उच्चांकी तापमान 
विदर्भात सर्वत्र उन्हाचा चटका वाढला आहे. तेथे नोंदल्या गेलेल्या प्रत्येक शहरातील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. राज्यातील सर्वाधिक तापमान विदर्भातील ब्रह्मपुरी येथे नोंदले गेले. त्यापाठोपाठ चंद्रपूर येथे ४५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या भागात सरासरीपेक्षा तीन ते पाच अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे.  

पारा ४० च्या वर गेलेली शहरे  
शहर  ....... कमाल  (सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये, कंसात सरासरीपेक्षा वाढलेले तापमान)
पुणे ....... ४०.७ ( २.९) 
लोहगाव .......  ४२ ( ४)
नगर .............. ४३.२ (३.८) 
जळगाव ....... ४४.५ (२.७) 
मालेगाव ............ ४२.६ (२.५) 
नाशिक .......  ४० ( २.१)
सांगली .......  ४०.२( १.४)
सातारा .......  ४०.९ ( ४.१) 
सोलापूर ....... ४३.१ (२.६)
औरंगाबाद....... ४१.४ (२.६) 
परभणी ....... ४४.२ (३.२)
नांदेड ......... ४४.५ (३.२)
बीड .......... ४३.२ (३.४) 
अकोला .......  ४५ (३.९) 
अमरावती ....... ४३.८ (२.४) 
बुलडाणा....... ४१ (३.४)  
ब्रह्मपुरी ....... ४५.९ (५.३) 
चंद्रपूर  ....... ४५.८ (४.१) 
गोंदिया ....... ४४.२ (३.८) 
नागपूर .......  ४५ (४.४)
वर्धा ....... ४५.०( ३.४) 
यवतमाळ....... ४३.५ (२.८) 

Web Title: Heat wave in state