विदर्भात वैशाख वणव्याची होरपळ कायम 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही वैशाख वणव्यातील होरपळ रविवारीही (ता. 12) कायम असल्याचे चित्र दिसले. विदर्भात अजूनही उष्णतेची लाट असल्याने कमाल तापमानाचा पारा वाढलेलाच होता.

पुणे - विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही वैशाख वणव्यातील होरपळ रविवारीही (ता. 12) कायम असल्याचे चित्र दिसले. विदर्भात अजूनही उष्णतेची लाट असल्याने कमाल तापमानाचा पारा वाढलेलाच होता. राज्यात ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक म्हणजे 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 39.9 अंश सेल्सिअस नोंदला गेला. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. वैशाखातील उन्हाचा चटका वाढल्याने स्थानिक वातावरणाचा परिणाम होऊन हे ढगाळ वातावरण तयार झाले होते. ते वातावरण आता निवळत आहे. त्यामुळे राज्यात हवामान कोरडे असून, काही भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. बिहार आणि परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तर दक्षिण छत्तीसगड या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्‍यता आहे. तसेच, तेलंगण व आसामच्या परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या भागात हवामान ढगाळ राहणार असून, काही भागात अवकाळी पावसाची शक्‍यता आहे. यामुळे महाराष्ट्रावर असलेले ढगाळ हवामान निवळून गेले आहे. मात्र, विदर्भाच्या काही भागांत हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे. यामुळे काही प्रमाणात उष्णतेत वाढ होऊन कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

पूर्व विदर्भात कोरडे हवामान असल्याने अजूनही उष्णतेची लाट आहे. यामुळे ब्रह्मपुरी, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला येथे उन्हाचा चटका अधिकच जाणवत होता. बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, गोंदिया या भागात उन्हाची तीव्रता काहीशी कमी होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heat wave in vidarbha