मोठी धरणे ओव्हरफ्लो; नांदूरमधमेश्‍वर, कोयनेतून विसर्ग सुरू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रविवारी मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली.

मुंबई/पुणे -  मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्रात सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रविवारी मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली. गंगापूर, खडकवासला, कोयना धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे. नांदूरमधमेश्‍वर गंगापूर धरणातून सुमारे अडीच लाख क्‍युसेकने पाणी सोडले जात असल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला दिलासा मिळाला. पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सांगली, रायगड या जिल्ह्यांतील नद्यांनी धोक्‍याची पातळी गाठली. राज्यातील काही भागांत पावसाने दाणादाण उडवल्याने महापुराची भीती निर्माण झाली आहे.

पुण्यात शनिवारी रात्रीपासून पावसाच्या सरी पडत आहेत. शनिवारी सकाळी साडेआठ ते रविवारी सकाळी साडेआठ या चोवीस तासांमध्ये शिवाजीनगर येथे ४५.९ मिलिमीटर पाऊस पडला. सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत तेथे १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीने आज महामुंबईला ‘हाउस अरेस्ट’ केले होते. महानगरातील सर्वच नद्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडल्यामुळे मध्य आणि हार्बर मार्ग ठप्प पडला होता. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट होता. रात्रीच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने  सकाळपासूनच दैनंदिन व्यवहार ठप्प पडले होते. रविवार असल्याने आज नागरिकांनी घरातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रस्त्यांवरही वर्दळ कमी होती. सकाळपासूनच मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प पडली होती.

सांगलीत महापूर उंबरठ्यावर 
सांगली : २००५ च्या महापुराची खपली आता कुठेही बसलीय, असे वाटत असतानाच पुन्हा कृष्णा नदी महापुराच्या उंबरठ्यावर उभी राहिली आहे. सांगली शहरात धोक्‍याच्या पातळीपासून कृष्णा अवघी तीन फूट दूर असून आयर्विन पुलाजवळ पातळी ४२ फुटांवर पोचली आहे.

वाळवा, शिराळा, पलूस आणि मिरज तालुक्‍याला या परिस्थितीचा मोठा फटका बसला असून शंभराहून अधिक गावे आणि वाड्यावस्त्यांवर पाणी शिरले आहे. या गावांतील हजारो लोकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. कोयना धरणातील पाणीसाठी तब्बल ९६ टीएमसी झाला असून आता कोयनेत पाणी रोखून धरणे जवळपास अशक्‍य आहे. कोयनेतून ५० हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो आता वाढवावा लागेल, मात्र इकडे पाऊस सुरूच राहिला तर मात्र कृष्णेची पातळी झपाट्याने वाढून ती धोक्‍याच्या पातळीवर जाईल, अशी स्थिती आहे. दुसरीकडे अलमट्टी धरणातून २ लाख ३३ हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तो तीन लाखापर्यंत वाढवावा लागेल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे.

गोदावरीच्या पुराचे रौद्ररूप
नाशिक : गोदावरीला २ ऑगस्ट २०१६ नंतर पहिल्यांदा आलेल्या महापुराने नाशिकमध्ये हाहाःकार उडवला. नंदिनी, वाघाडी, कपिला, वालदेवी नद्यांना महापूर आला असून १२ पुलांवरून पाणी वाहू लागल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. त्र्यंबकेश्‍वरच्या ज्योतिर्लिंग मंदिरात महापुराचे पाणी शिरले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in maharashtra Dam overflows