मराठवाड्यात नदी, नल्यांना पूर; चौदा मंडळांत अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 21 September 2020

मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना,परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील१४मंडळांत अतिवृष्टी झाली.मुसळधार पावसामुळे करपरा,दुधना,इंद्रायणी,पूर्णा नद्या तसेच ओढे,नाल्यांच्या पुराचे पाणी शेतातील पिकांमध्ये शिरले

पुणे -  मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि वऱ्हाडातील काही भागांत शनिवारी (सायंकाळी) जोरदार पाऊस झाला. नदी, नाल्यांना पूर आल्याने पिकांसह शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. सोयाबीनला झाडावरच कोंब फुटले तर अनेक ठिकाणी कपाशी पीक पाण्याखाली गेले. द्राक्षबागांमध्ये पाणी साचून काही ठिकाणी ऊस आडवा झाला.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चार जिल्ह्यांतील १४ मंडळांत अतिवृष्टी झाली. परभणी जिल्ह्यातील बहुतांशी मंडळात पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे करपरा, दुधना, इंद्रायणी, पूर्णा नद्या तसेच ओढे, नाल्यांच्या पुराचे पाणी शेतातील पिकांमध्ये शिरले. त्यामुळे पिके आडवी झाली. पूर्णा नदीच्या पाण्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर आदींसह भाजीपाला, फळे, पिकांची मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या शेंगा भिजून-भिजून त्यांना झाडावरच अंकुर फुटले आहेत. हिंगोली जिल्ह्यात ओढे, नाल्याचे पाणी शिरल्यामुळे ७०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टी सोयाबीन, बाजरी, मका पिकांना फटका बसला. पावसामुळे अनेक ठिकाणी शेताचे बांध ओलांडून पाणी वाहिले. तर काही ठिकाणी शेतातून माती वाहून गेली. सोंगणीला आलेले बाजरीचे पीक आडवे झाले. कपाशीचे बोंडे खराब होत असून द्राक्ष छाटण्या रखडल्या आहेत. नवीन कांदा लागवडीमध्ये पाणी साचून राहिल्याने रोपे खराब होत आहेत.  

पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव, बारामतीसह अनेक भागांत शनिवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे भाजीपाला पिकांना फटका बसला. तर, नगर जिल्ह्यातील नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव भागाला जोरदार पावसाने झोडपल्याने खरीप पिकांचे नुकसान केले. जिल्ह्यातील काही भागांत सध्या सोयाबीन सोंगणी सुरु आहे. शेतात सोंगणी करून ठेवलेले सोयाबीन पावसात भिजले.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नद्यांचे पाणी शिवारात
परभणी जिल्ह्यात करपरा, दुधना, इंद्रायणी, पूर्णा नद्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन, कपाशी, मका, हळद आणि तूर पिकाचे नुकसान झाले. भाजीपाला पिके आणि फळबागांना मोठा फटका बसला. सोयाबीनच्या शेंगा सतत भिजून त्यांना झाडावरच अंकुर फुटले. हिंगोली जिल्ह्यात ओढे, नाल्यांचे पाणी शेतात शिरल्यामुळे ७०० हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुरात वाहून गेल्याने बाप-लेकीचा मृत्यू
भोकरदन - ओढ्याच्या पुरात दुचाकीसह वाहून गेलेल्या बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.१९) रात्री सोयगाव देवी (ता. भोकरदन) येथे घडली. विलास शालिक सहाने (वय ३०) व कल्याणी विलास सहाने (७) अशी मृतांची नावे आहेत. विलास सहाने सोयगाव देवी परिसरातील त्यांच्या शेतात राहतात. किराणा घेण्यासाठी काल ते मुलीसोबत दुचाकीने गावात आले होते. परिसरात दीड ते दोन तास मुसळधार पाऊस झाल्याने ओढे, नाल्यांना पूर आला होता. पावसाचा जोर ओसरल्यावर दोघे घराकडे परतत असताना पोतका ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरचा ताबा सुटला व ते पुरात वाहून गेले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in Marathwada